संस्कार आणि शिक्षण यासाठी शिक्षक,पालकांनी वेळ द्यावा. – शिक्षणाधिकारी संजय नाईकडे
कदमवस्ती शिक्षक दांपत्याचा नागरी सत्कार
प्रतिनिधी
जेजुरी, दि. ५ जीवनात पद,पैसा मिळेल पण संस्कारक्षम मुलगा मिळणार नाही,संस्कार हीच मुलांच्या आयुष्याची खरी शिदोरी असून ,प्रत्येक मुलाकडे ही शिदोरी असावी यासाठी चारित्र्यसंपन्न,संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे ही पालकांची व शिक्षकांची मोठी जबाबदारी असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी सांगितले.
बेलसर-साकुर्डे(ता.पुरंदर) येथील कदमवस्ती जिल्हा परिषद शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा व अध्यक्ष चषक, सभापती चषक आदी स्पर्धेत पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक तसेच उज्वल यश मिळविल्याबद्दल कदमवस्ती शाळेच्या पालकांनी बाल आनंदोत्सव मेळाव्याचे आयोजन करीत शाळेचे मुख्याध्यापक अनंत जाधव, सहशिक्षिका सुरेखा जाधव या शिक्षक दाम्पत्यांचा सन्मान सोहळा शिक्षणाधिकारी नाईकडे यांच्या शुभहस्ते जेजुरी येथील मल्हार नाट्यगृह येथे आयोजित केला होता.
यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना नाईकडे यांनी ‘साधूसंतांनी सांगितल्या प्रमाणे मुले हीच परमेश्वराचा अंश आहे तर शाळा हे एक गावचं दुसरे मंदिर आहे व या मंदिरात मुलांच्या प्रगतीसाठी या शिक्षक दाम्पत्यांबरोबरच हितचिंतक, पालक ग्रामस्थ यांनी शाळेच्या विकासासाठी दिलेल्या योगदानातूनच शाळेला हे यश मिळाले असुन महाराष्ट्राच्या नकाशावर ही शाळा चमकली असल्याचे कौतुक करीत आता शाळेची मॉडेल स्कूलमध्ये ही समावेश झाला आहे. भविष्यात शाळेला पुणे जिल्हा परिषद सर्वतोपरी मदत करीत राहीन. पालकांच्या मागणीनुसार टेलिस्कोप दुर्बीणही येथे देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेला मिळालेल्या या यशामध्ये शिक्षक म्हणून आम्ही जरी योगदान दिले असले तरी यासाठी अहोरात्र झटणारे पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामस्थ,पत्रकार,थोर देणगीदार व विद्यार्थी यांच्या सामूहिक एकुतूनच हे शक्य झाले आहे तर या एकीच्या माध्यमातूनच आता राज्यातही कदमवस्तीचा नावलौकिक वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे अनंता जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
यावेळी पालक आणि आजी माजी विध्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. शालेय विध्यार्थ्यांनी विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम ही सादर केले.
“आई-वडील शाळेसाठी अहोरात्र काम करतात, अगदी रात्रही त्यांचे ऑनलाइन तास असतात,यातून शक्य तेवढा वेळ आम्हालाही देतात पण ते नेहमी सांगतात शासनाकडून आपल्याला जो पगार मिळतो,त्यातील प्रत्येक पैसा हा या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा असून तेवढा वेळ आपण त्यांच्यासाठी दिला पाहिजे. याच दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल सुरू असल्याने सुरुवातीला आतकरवाडी व आता कदमवस्ती या शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले याचा त्यांची मुले म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.”
डॉ क्षितिजा जाधव,जाधव शिक्षक दांपत्याची मुलगी.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी(योजना) सुचेता पाटेकर,प्रभारी गटशिक्षणाधिकारी गोविंद लाखे, शाळा दत्तक घेणारे जेष्ठ पत्रकार बी.एम.काळे, विस्तार अधिकारी राजेंद्र कुंजीर, शिक्षक नेते संदीप कदम, सुनील कुंजीर, दि. चि. कदम, बेलसरचे सरपंच अर्जुन धेंडे, उपसरपंच धीरज जगताप, ऋषिकेश कदम, संपत गरूड, श्रीकांत कदम, बबन कदम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.एम.काळे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.संदीप टिळेकर व आभार व्यवस्थापन समिती चे गणेश गरूड यांनी मानले.




