ऑनलाईन पोर्टल द्वारे शिक्षक बदल्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च !
पूर्वीप्रमाणेच कमी खर्चात ऑफलाईन बदल्याच हव्या...
बदली पात्र शिक्षकांना ३० शाळा निवडण्याची संधी मात्र ,
ज्युनिअर शिक्षकांना विस्थापित होण्याची धास्ती.
प्रतिनिधी..
जेजुरी, दि. ९
पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे(पोर्टलद्वारे) बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरु आहे.शिक्षक बदल्या सुरळीत व पारदर्शक व्हाव्यात म्हणून ग्रामविकास विभागाने पुणे येथील विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीला कोट्यवधी रुपयांचे टेंडर दिले आहे.
१ ते ७ टप्प्यांमध्ये शिक्षक संवर्ग १ ते ४ नुसार प्रत्येक संवर्गातील बदलीपात्र शिक्षकाची बदली करणे बंधनकारक आहे.५ ते ८ ऑगस्ट दरम्यान पुणे जिल्ह्यातील संवर्ग ४ मधील सुमारे २७०० ते २८०० शिक्षकांच्या बदल्या करणे बंधनकारकच आहे.
हवेली,पुरंदर,बारामती,दौंड या सुगम (सोप्या) तालुक्यातील प्रत्येकी सुमारे २०० ते ३०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.मात्र या तालुक्यांत शिक्षक संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येक तालुक्यातील बहुतांश ज्युनियर शिक्षकांना दुर्गम (अवघड)भोर,वेल्हे,मावळ,मुळशी तालुक्यांतील कमी (रिक्त) शिक्षक संख्या असणाऱ्या शाळांवर बदलीने जावे लागणार आहे.
बदलीपात्र शिक्षकाला ऑनलाईन संगणकीय पोर्टलवर बदलीसाठी ३० शाळा निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र हे ३० पर्याय निवडताना जर सेवाज्येष्ठ(सिनिअर) शिक्षकाने सेवा कालावधी कमी (ज्युनिअर) शिक्षकाच्या अगोदर एखाद्या शाळेची निवड केली तर ज्युनियर शिक्षकाला ती शाळा मिळत नाही.
सिनिअर शिक्षकाने निवडलेल्या शाळा पडताळणीची संधी जुनिअर शिक्षकांना उपलब्ध करुन दिली आहे.मात्र अत्यंत कमी कालावधीत शेकडो शिक्षकांनी निवडलेल्या शाळांची पडताळणी करणे शक्य होत नाही.
त्यामुळे संधी उपलब्ध असताना देखील अंदाजे ३० शाळा भराव्या लागतात. संधीचा उपयोग होत नाही.
त्यामुळे अनेक ज्युनिअर शिक्षकांना तालुक्यामध्ये रिक्त शाळा उपलब्ध असताना देखील दुसऱ्या तालुक्यात बदलीने जावे लागते.हे पूर्वी झालेल्या अशा बदल्यांमध्ये निदर्शनास आले आहे.
त्यामध्ये आवश्यक सुधारणा झाल्या नसल्यामुळे पूर्वीप्रमाणे दूरच्या ठिकाणी बदली होणार म्हणून ज्युनिअर शिक्षक धास्तावले आहेत.
१) पोर्टलमध्येच शाळा निवडताना संबंधित शाळा किती जणांनी घेतली याबाबत माहिती होणे आवश्यक होते.
२) फक्त ४ दिवसांत शेकडो सेवा ज्येष्ठ शिक्षकांनी अगोदर कोणती शाळा घेतली हे चेक करणे सर्वांनाच शक्य होत नाही.
३) पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यातील रिक्त शाळा मोठ्या पडद्यावर दाखवून होणाऱ्या ऑफलाइन बदल्या या अतिशय कमी खर्चात व पारदर्शक असल्याचे शिक्षकांचे मत.
४) ऑनलाइन संगणकीय बदल्या म्हणजे आंधळी कोशिंबीर खेळ मांडला आहे.




