दिव्यांग शिक्षकांची फेर तपासणी जे.जे.कडून व्हावी.
ससून अधिक्षकांची जिल्हा प्रशासनला शिफारस.
प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेपूर्वी जिल्हा परिषदेतील संवर्ग १ मधील दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांच्या दिव्यंगत्वाच्या खोट्या प्रमाणपत्राच्या तक्रारी उद्भवू नये. म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या ४०९ दिव्यांग शिक्षकांना दिव्यांगत्वाची व प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ससून प्रशासनाला कळविले होते.
मात्र,ससून सर्वोपचार रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे टर्शरी केअर सेंटर असल्याने येथे गंभीर व अतिगंभीर रुग्णांची दाखल संख्या प्रचंड मोठी आहे.न्यायालय व पोलीस विभागामापर्फत वैद्यकीय तपासणी व उपचारांसाठी पाठविण्यात येणारे न्यायबंदी,आरोपी तसेच विविध वैद्यकीय तपासण्या व उपचाराकरीता येणारे नागरीक व रुग्णांची संख्या खूप मोठी आहे.संस्थेत शिक्षण घेत असलेले पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे अध्यापन,प्रात्यक्षिक व परीक्षा ही कामे सुध्दा संस्थेतील अध्यापक व डॉक्टरांना असतात. तातडीची रुग्णसेवा,न्यायवैद्यकीय प्रकरणे,वैद्यकीय प्रकरणे,व्ही.व्ही.आय.पी.व्हीजीट, एम.एल.सी. केसेस, वयाची तपासणी, दिव्यांग प्रमाणपत्रे अशा अनेक प्रकरणी ससून रुग्णालयातून सेवा पुरविली जाते. त्यामुळे ससून सर्वोपचार रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे.
दिव्यंगत्वाची तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांगची संख्याही जास्त आहे.त्यामुळे सर्व कामे सांभाळून दिव्यांगाची तपासणी व प्रमाणपत्र वाटपाचे काम केले जाते.सप्टेंबरपर्यंत नियमित दिव्यांगांची तपासणी व प्रमाणपत्र वाटपासाठी प्रतिक्षेत आहेत.
त्यामुळे संवर्ग १ मधील दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची व प्रमाणपत्राची फेर तपासणी होऊ शकत नाही.त्यामुळे संबंधित शिक्षकांची तपासणी जे.जे.रुग्णालय मुंबई येथे करावी.असे ससून रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.यल्लाप्पा पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याकडे केली आहे.
त्यामुळे संवर्ग १ मध्ये असणाऱ्या बोगस दिव्यांगांची तपासणी झाल्याशिवाय प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार का नाही याबाबत साशंकता आहे.