शिक्षक वार्षिक सभेत दोन शिक्षकांची फ्री-स्टाईल हाणामारी
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षकच भांडू लागले,तर….!
प्रतिनिधी
जेजुरी, दि.३. गाव- खेड्यातील वाद विकोपाला गेल्यामुळे आपापसात बाचाबाची झाली… तुफान हाणामारी झाल्याचे वेगवेगळे किस्से ऐकिवात आहेत.परंतू विद्यार्थ्यांनाच ज्ञानदानासह नैतिकतेचे धडे देणाऱ्या पुरंदर मधील दोन पुढारी गुरुजींनीच तुफान हाणामारी केल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना पुरंदर शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्या ठिकाणी होती त्या आचार्य अत्रे सभागृहाच्या समोरील वर्दळीच्या व भर रस्त्यावरच झाल्याने शिक्षक वर्ग चांगलाच धास्तावला आहे.संपूर्ण शिक्षण क्षेत्रात याची मोठीं चर्चा आहे.
एकाच शिक्षक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी व पुरंदर तालुका एक माजी पदाधिकारी या दोघांमध्ये पिसर्वे केंद्राचे केंद्रप्रमुख सेवानिवृत्त झाले.म्हणून त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम २८ जुलै रोजी झाला.त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पुरंदर मधील सेवानिवृत्त झालेले केंद्र प्रमुख हे केंद्र प्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष असताना देखील या कार्यक्रमात त्यांचा नामोल्लेख जाणिवपूर्वक टाळल्याच्या आरोपावरुन या दोन शिक्षक पुढाऱ्यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ जुलै रोजी पार पडली.त्या निमित्त हे दोन्ही शिक्षक पदाधिकारी वार्षिक सभेला समोरासमोर आले. त्या ठिकाणी देखील त्या दोघांची वाद सुरु झाले.अर्वाच्य भाषेत एकमेकांचे “तंगडेच काढतो.” अशा प्रकारे दमबाजी व एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र त्या ठिकाणी अनेक शिक्षक असल्यामुळे त्या दोघांचे भांडणे सोडवण्यात आली.
मात्र,सभा संपल्यानंतर सभागृहाबाहेरील रस्त्यावर पुन्हा एकदा हे दोन्ही शिक्षक समोरासमोर भिडले व डायरेक्ट कोणालाच काही समजायचे आतचं अचानक दोघेही आपापसात भांडू लागले.एकमेकांना मारहाण करु लागले.एकमेकांची गचांडी पकडून फ्री स्टाईलने फायटींग सुरु केली.एकमेकांना लाथा बुक्क्या मारत सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावरचं एकमेकांना खाली पाडत बोकांडी बसले.अश्लील शिवीगाळ व विचित्र हावभाव करत दोघांनीही एकमेकांची कपडे फाटेपर्यंत हाणामारी केल्याने उपस्थित पाहणारेही घाबरले.उपस्थितांनी आरडा-ओरडा व गोंधळ केल्यामुळे काही शिक्षक सहकारी मदतीला धावून आले.त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
हे भांडणे करणारे शिक्षक नातलग आहेत.मात्र संघटनात्मक पातळीवरील राज्याध्यक्षांचे नाव टाळल्यामुळे मानापमान नाट्यातून शिक्षक संघटनेतील वर्चस्वासाठी या दोघांना नात्यांचा देखील विसर पडल्याची चर्चा आहे.
मात्र या अशोभनीय व निंदनीय घटनेमुळे पुरंदरच्या शैक्षणिक क्षेत्राची बदनामी झाली असून जिल्हा परिषदेने गुणवंत व आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेल्या शिक्षक जर अशा प्रकारे रस्त्यावर येऊन हाणामारी करत असतील तर यांच्याकडून आदर्श काय घ्यायचा.अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे.