चंपाषष्टी निमित्त जेजुरी गडावर दोन लाखावर भाविकांची गर्दी
चंपाषष्टी निमित्त जेजुरी गडावर दोन लाखावर भाविकांची गर्दी
जेजुरी, दि.१८ तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टीचे औचित्य साधून काल रविवारी आणि आज सुमारे दोन लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. ‘सदांनंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात भंडार खोबर्याच्या उधळणीत भाविकांनी रांगा लावून कुलदैवताचे दर्शन घेतले. गडावर आणि शहरात सर्वत्र कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम तसेच देवाचा जयघोष ऐकू येत होता. भंडार खोबर्याच्या मुक्त हस्ताने करण्यात आलेल्या उधळणीमुळे संपूर्ण गडकोट आणि प्रमुख रस्ते पिवळ्या जर्द भंडार्याने माखल्यामुळे सोन्याच्या जेजूरीचा भास होत होता.
आज सकाळी देवाची महापूजा, महाभिषेकानंतर बालदारीतील घट उठवण्यात आले. त्यानंतर घराघरातील ही घट उठले. देवाला वांगे भरीताचा नैवेद्य दाखवून उत्सवाचा उपवास सोडण्यात आला. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या कालावधीत जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सव साजरा होतो. प्रतिपदेपासून मार्तंड भैरवाने दानवांशी युद्ध सुरू केले ते सहा दिवस चालले. षष्ठीला देवाने दानवांवर विजय मिळवला. ऋषी मुनींनी चाफ्याच्या फुलांनी देवाची पूजा करून विजय दिवस साजरा केला अशी आख्यायीका असून तेव्हापासून हा उत्सव साजरा होत आहे. या सहा दिवसात राज्यातून लाखो भाविक जेजुरी गडावर येवून देवदर्शन घेत असतात. जेजूरीकर ही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. येथील पुजारी सेवक वर्गाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याच बरोबर सलग सहा दिवस जेजुरी गडावर येणार्या भाविकांना देव संस्थान आणि मंडळाकडून दुपारचे मिष्टान्न भोजन ही देण्यात येत होते. सहा दिवसात हजारो भाविकांना अन्नदान करण्यात आले.
आज सकाळ पासूनच जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी होती. जेजुरी पोलिसांनी वाहतुकीबरोबरच बंदोबस्त चोख ठेवला होता. मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे, अड् विश्वास पानसे, अनिल सौन्दडे, अड् पांडुरंग थोरवे, डॉ.राजेंद्र खेडेकर गडकोटावर जातीने हजर राहून भाविकांच्या सोयी सुविधावर लक्ष ठेवून होते. वयोवृद्धव अपंग भाविकांसाठी गडावर आणणे व खाली पोहोचवण्यासाठी देव संस्थांकडून चार वाहनांची सोय केली होती
भाविकाकडून देव दर्शनाबरोबरच कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी उरकण्यात येत होते.