जेजुरीपुणेपुरंदरमहाराष्ट्रसामाजिक

ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जेजुरी गडाच्या पायथ्याशी विसावला

माऊलींचे जेजुरीत भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत, माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन
प्रतिनिधी
जेजुरी, दि. १३ येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम च्या गजरात दिंडीकरी वैष्णव आज कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाच्या नगरीत सायंकाळी सहा वाजता पोहोचले. जेजुरीकरांनी व जेजुरी नगरपालिका, मार्तंड देवसंस्थान यांच्यावतीने भंडार्‍याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी टाळ मृदंगाच्या गजराने जेजुरीनगरी दुमदुमली. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडार खोबर्‍याच्या उधळण करीत गडकोटात येळकोट येळकोट जय मल्हार, आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात दर्शन घेतले.

आज सकाळी सात वाजता श्री संत सोपानकाकांच्या सासवड नगरीचा निरोप घेऊन सोहळ्याने कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजूरीकडे प्रस्थान ठेवले. सकाळचे कोवळे ऊन, अधून मधून होणारा ऊन सावलीचा खेळ, दिंडी दिंडीतून येणारे अभंग, भूपाळी, वासुदेव, गौळणी, आंधळे, पांगळे, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग आदींचे सुर संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि उत्साह निर्माण करीत होते. या उत्साही वातावरणात सोहळ्यातील वैष्णव झप झप पावले टाकीत खंडोबाची जेजुरी जवळ करीत होता. ज्ञानोबा माऊलींच्या गजरात सोहळा जेजुरीकडे येत असताना बोरवके मळा येथील न्याहारी, पुढे शिवरी येथील दुपारची विश्रांती त्याच बरोबर साकुर्डे येथील विसावा उरकून सायंकाळी ६.१५ वाजता मजल दर मजल करीत सोहळा जेजुरीत पोहोचला.

जेजुरीत पालिकेच्या नगराध्यक्ष जयदीप बारभाई,उपनगराध्यक्ष गणेश निकुडे,मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, नगरसेवक योगेश जगताप कृष्णा कुदळे, रोहित खोमणे, तानाजी खोमणे, गणेश डोंबे, अस्लम पानसरे, मंदा बयास, प्रियांका देशमुख, भक्ती कोरपड, प्रज्ञा राऊत, अमीना पानसरे, मोनिका घाडगे, योगिता दोडके, मेघा उबाळे, स्वरूपा खोमणे, स्नेहल भालेराव, नीलम सातभाई, तसेच आजी माजी नगरसेवक आदींनी माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी सदानंदाच्या जयघोषात माउलींच्या रथावर भंडार्‍याची मुक्त हस्ताने उधळण करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी माऊलींचे स्वागत करण्यात येत होते. मार्तंड देव्संस्थानच्यावतीने ही प्रमुख विश्वस्त अड विश्वास पाणसे, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अड पांडुरंग थोरवे, अभिजित देवकाते, अनिल सौन्दडे व्यवस्थापक आशिष बाठे यांनी भंडार्‍याच्या उधळणीत माऊलीचे स्वागत केले.

दररोज अबीरबुक्यात न्हाऊन निघणारा सोहळा जेजूरीत पिवळ्या जर्द भंडार्‍यात न्हाऊन निघाला. जेजुरी नगरीच्या पश्चिमेला माऊलींचा पालखी सोहळा पालखी तळावर पोहोचला. शहरानजिक असल्यामुळे शहर आणि परिसरातील अनेक भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले.
सायंकाळी ७ वाजता माऊलींचा पालखी सोहळ्याची समाज आरती झाली. यावेळी आजच्या अपघातात मृत झालेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहन्यात आली. तसेच आळंदी देव संस्थान च्या वतीने वारीतील अधिकृत दिंडीतील कोणी ही वारकरी सोहळ्यात दगावला तर त्याच्या कुटुंबियांना एक लाख रुपये. तर जखमीना २५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासाठी देव संस्थान च्या नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे. सोहळ्यातील सहभागी वाहनांनी उजव्या बाजूने तर वारकऱ्यांनी डाव्या बाजूने मार्गस्थ होण्याची सूचना ही यावेळी करण्यात आली. उद्या सकाळी सहा वाजता सोहळा वाल्हेकडे प्रस्थान ठेवणार आहे. यानंतर सोहळा मल्हार नगरीत विसावला.

आज दिवसभर माऊलींच्या सोहळ्यातील वारकरी भाविक तीर्थक्षेत्र जेजुरीत येत होते. जेजुरीत प्रवेश केल्यानंतर वारकरी जेजुरी गडावर जाऊन कुलदैवताचे दर्शन करून कुलदैवताची वारी ही पूर्ण करीत होते. जेजुरी गडावर ही मोठी गर्दी होती. तर मुख्य चौकात मार्तंड देव संस्थान कडून मोठी स्क्रीन लावून गडकोटातील गाभऱ्यातील देव दर्शन घडवण्यात येत होते.
वारीच्या वाटेवर ठीक ठिकाणी वैष्णवांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच विविध संघटना, संस्थाकडून मोफत अन्नदान, आरोग्य सुविधा पुरवण्यात येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page