सुट्टीच्या दिवशी शिक्षण परिषदेच्या नावाखाली सत्कार समारंभ. चांबळी शाळेतील प्रकरण ; फेर चौकशी होणार… केंद्रप्रमुख व शिक्षकांवर कारवाईची तलवार
प्रतिनिधी
पुरंदर, दि. ९ पुरंदर तालुक्यातील चांबळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ८ मार्च २०२५ रोजी सुट्टीच्या दिवशी शाळा सत्कारगृह बनली.प्रभारी केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांनी ‘शिक्षण परिषदेच्या’ नावाखाली शाळेचा वापर करुन या येथील शिक्षक मोहन जगताप यांचा पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार व जेवणावळीचे आयोजन केले.
या प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच शिक्षण विभागाने गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी लगेचच जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी निलिमा बधे व गोरक्षनाथ हिंगणे यांना चौकशीचे आदेश दिले होते.मात्र चौकशी अहवाल हा दोषींना वाचवण्यासाठी एकतर्फी बनवल्याचे आरोप झाले.तक्रारदारीमध्ये दिलेले पुरावे व मुद्दे चौकशीत दुर्लक्षित झाल्याचे समोर आले.
या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने चौकशी समितीवर ठपके ठेवले.आदेश असूनही अहवाल वेळेत सादर न झाल्याने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेण्यात आली. त्यानुसार दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी पत्र जारी करुन फेर चौकशीचे स्पष्ट आदेश दिले.या वेळी सविस्तर व पुराव्यांसहित अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश शिक्षण विस्तार अधिकारी निलीमा बधे व गोरक्षनाथ यांना देण्यात आले आहेत.
फेर चौकशीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे व शिक्षक मोहन जगताप यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रात चर्चेत आहे.
