आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ; मात्र पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी अनुपस्थित
प्रतिनिधी
जेजुरी, दि. १०
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि. ७ सप्टेंबर २०२५) पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे उपस्थित राहिले.हुतात्मा स्मारकाला त्यांनी अभिवादन केले.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुरंदरच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
हुतात्मा उमाजी राजे हायस्कूल भिवडी येथे सभा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.तथापि,शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल मात्र कार्यक्रमास अनुपस्थित राहिले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात जबाबदार अधिकारी अनुपस्थित राहणे ही बाब उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरली.
राज्य शासनाच्या प्रोटोकॉल नियमावली (१९९७) नुसार, अशा कार्यक्रमास गैरहजर राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. महाराष्ट्र सेवा नियमावलीनुसार ही बाब निष्काळजीपणात गणली जाऊ शकते. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी डुबल यांची अनुपस्थिती वैयक्तिक कारणामुळे होती की,प्रशासकीय दुर्लक्षामुळे होती! याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातून या प्रकरणाविषयी संताप व्यक्त होत असून शिक्षण विभागाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
अनुपस्थिती बाबत गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देणे टाळले.
