शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेचा फार्स ! दुपारी १वाजेपर्यंतच पार पडली ३ प्रशिक्षणे; पुरंदर शिक्षण विभागाचा अजब कारभार
प्रतिनिधी
जेजुरी, दि. ६
पुरंदर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने ३ सप्टेंबर रोजी महात्मा फुले माध्यमिक विद्यालय,शिवरी येथे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर आदेशाची माहिती एक दिवस अगोदर दिली. स.१० ते दु. ४ या वेळेत कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचा उल्लेख पत्रामध्ये होता. मात्र या प्रशिक्षणा दरम्यान तंबाखूमुक्त कार्यशाळा व नवसाक्षरता कार्यक्रम प्रशिक्षण या आणखी कार्यशाळा घेतल्या. त्यामुळे शिक्षण विभागाने केवळ कागदोपत्री फार्स करत दु.१ वा. पर्यंत ३ प्रशिक्षणे घेतली. त्यामुळे पुरंदरच्या शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला आहे.
विशेष म्हणजे पुरंदर तालुक्यातील एकूण २१८ शाळासाठी हे प्रशिक्षण होते. एकूण २१८ शिक्षक आणि २१८ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किंवा सदस्य असे ४३६ जणांना प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र या कार्यशाळेला एकूण फक्त ६ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थित होते. अनेक शिक्षक ही अनुपस्थित होते. तरी देखील त्यांच्या उपस्थितीची खोटी नोंद कार्यशाळेच्या हजेरीत करण्यात आली. ज्यांच्यासाठी हे प्रशिक्षण होते ते सदस्य आणि अध्यक्ष अनुपस्थित राहिल्याने ही कार्यशाळा कागदोपत्री
दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे.
कार्यशाळेला डाएट चे जेष्ठ अधिव्याख्याते डॉ. प्रभाकर क्षीरसागर, निपुण पुणे मॉडेल स्कुल च्या जिल्हा परिषद समन्वयिका श्रेया बॅनर्जी
मुख्यमंत्री फेलोशिप जिल्हा परिषदचे चेतन भालके यांनी मार्गदर्शन केले.
सकाळी ११ ते दुपारी १ वा.या वेळेत ३ वेगवेगळ्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन झाल्याने व आकडेवारी फुगवून वरच्या पातळीवर “कामकाज झाले” असा आभास निर्माण करण्याचा हा उघड झाल्यामुळे शिक्षण विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
गुणवत्ता विकासाच्या नावाखाली खोटे अहवाल सादर करणे हे शैक्षणिक विश्वाचा विश्वास डळमळीत करणारे आहे.
या प्रकाराबाबत डाएट चे जेष्ठ अधिव्याखाते डॉ. क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. आपण स्थानिक शिक्षण प्रशासनाशी संपर्क साधण्याचा साळसूद सल्ला दिला. तर कार्यशाळेची संपूर्ण जबाबदारी असणारे पुरंदर चे गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीसाठी पुणे येथे गेल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेला शिक्षण अधिकारी गोविंद लाखे व राजेंद्र कुंजीर यांचे सह केंद्रप्रमुख राजेंद्र अद्वैत,प्रवीण इंदलकर, जितेंद्र कुंजीर, सुरेखा कामथे,विषयतज्ञ भरत जगदाळे,दिपक पाटील आदि उपस्थित होते.
१) शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांना कार्यशाळेमध्येशाळेच्या कामकाजाची माहिती, शाळेचा वार्षिक विकास आराखडा खर्च व निधीचा उपयोग,शासनाच्या योजना कशा वापरायच्या याबाबत मार्गदर्शन होते आवश्यक होते.तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांविषयी जाण,मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क (RTE), विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंबंधी नियम, शाळा सोडून जाण्यापासून प्रतिबंध.गुणवत्ता सुधारणा भूमिका,शिक्षक व पालक यांच्यात समन्वय कसा ठेवायचा,विद्यार्थ्यांच्या उपस्थिती व गुणवत्तेकडे लक्ष कसे द्यायचे याबाबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांना पुरंदर मध्ये मार्गदर्शन झाले नाही.
२) शिवरी हायस्कूलमध्ये हायस्कूल शाळा सुरू असताना देखील पुरंदरचा शिक्षण विभाग वारंवार अशा कार्यशाळा घेतात. याबाबत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये शाळेच्या वेळात प्रशिक्षणे घेऊ नयेत याबाबत सूचना व पत्रव्यवहार करून देखील अंमलबजावणी होत नाही.
प्रशिक्षण सुरु असताना कार्यशाळेतील शिक्षक बाहेर फिरत असतात, अनेकजण निघून ही जात होते.
३) एकाच वेळी ३ प्रशिक्षणे दाखवून वेगवेगळ्या दिवशी सदर प्रशिक्षणे झाल्याचे प्रशासनाला कळवून सदर निधी लाटण्याचा प्रकार होतो की काय अशा शंका निर्माण होतं आहेत.




