जेजुरीधार्मिकपुरंदरमहाराष्ट्र

‘येळकोट येळकोट’च्या गजरात जेजुरीत दोन लाख भाविकांची गर्दी

 

प्रतिनिधी

जेजुरी ,दि. ९ अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या सोमवती यात्रा आणि दिवाळी सण या दुग्धशर्करा योगावर रविवारी व सोमवारी दोन दिवसात दोन लाखांवर भाविकांनी जेजुरीत गर्दी केली होती. ‘सदानंदाचा येळकोट , येळकोट, येळकोट, जयमल्हार’…असा जयघोष करीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण केली. देवदर्शन, क-हा स्नानाची पर्वणी तळीभंडार, जागरण गोंधळ आदी कुलधर्म कुलाचार पूजन उरकून अमावास्येचा वारी पूर्ण केली.

सोमवारी अमावस्या असेल त्या दिवसाला सोमवती यात्रा भरते, या दिवशी अमावस्या पर्वकाळात खंडेरायाच्या उत्सवमूर्ती पालखी सोहळ्याद्वारे गडकोटातून क-हा नदीतीरावर नेल्या जातात राज्याच्या विविध प्रांतातून आलेले भाविक आणि समस्त जेजुरीकर खादेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी यांच्या वतीने उत्सवमूर्तींना विधिवत अभिषेक स्नान घालण्यात येते,

यंदा सोमवारी (दि.९) सकाळी १२.३१ वाजेपर्यंतच अमावास्येचा पुण्यकाळ असल्याने पहाटे ५ वाजता मुख्य वतनदार इनामदार बळवंत पेशवे, रोहन पेशवे, सचिन पेशवे, यांनी आदेश देताच भाविकांनी केलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीत गडकोट आवारातून पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले. देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. दिवाळ सण असल्याने गटकोटाला करण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि शोभेच्या फटाका्यांच्या अतिशबाजीने पहाटेच्या वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी मुख्य विश्वस्त अड. विश्वास पाणसे, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, अड पाडुरंग थोरवे, अनिल सौदंडे, व्यवस्थापक आशिष बाठे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गंणेश आगलावे ,नित्य वारकरी व शहरातील अठरा पगड जातीधर्मातील मानकरी खांदेकरी ,पुजारी ,सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .पालखी सोहळ्यापूढे घडशी समाजबांधवांचा सनईचा मंगलमय सूर, छत्र चामरे, अब्दागिरी, मानाचा अश्व, आदींच्या साथीने पालखीने मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळा गडकोटाबाहेर पडला. यावेळी सज्जातील भाविकांनी सोहळ्यावर येळकोट येळकोट च्या जयघोष करीत भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने उधळण केली.
अवघड पायरी मार्ग उतरून नंदी चौकातून सोहळा मल्हार गौतमीश्वर मंदिरात पोहोचला.होळकरांचा मान स्वीकारून सोहळा मुख्य शहरातील ग्राम देवता जाणाई मंदिर मार्गे शिवाजी चौकातून धालेवाडीमार्गे क-हानदीतीराकडे मार्गस्थ झाला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कऱ्हा काठावर पोहोचला. खंडोबा – म्हाळसादेवी उत्सव मूर्तींना विधीवत घालण्यात आले. स्नान, धार्मिक विधी उरकल्यानंतर पालखी सोहळा धालेवाडी गावकर्‍यांचा मान स्वीकारून फुलाई माळीण कट्टा ,जानाईदेवी कट्टा ,येथे मान पान देत घेत दुपारी दोन वाजन्याच्या सुमारास पालखी सोहळा ग्रामदेवता जानाई मंदिरासमोर विसावला. संपूर्ण दिवसभर सोहळा भाविक, आणि ग्रामस्थांच्या दर्शनासाठी या ठिकाणी थांबून होता. रात्री ८ वाजता सोहळा गडकोटात दाखल झाला. रोजमुरा वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली .जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील ,यांच्यासह १० पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २०० पोलीस कर्मचारी वर्ग बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता .देवसंस्थानच्या वतीने भाविक, खांदेकरी मानकरी यांचेसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार उपलब्ध करून दिला यंदाच्या सोमवती उत्सवावर दिवाळ सणाचा परिणाम जाणवला. अपेक्षेपेक्षा यात्रेत भाविकांची गर्दी जाणवली नाही. देवदर्शन उरकून भाविक माघारी फिरत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page