विमानतळ भुसंपादन वाटपाबाबत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा प्रांत कार्यालयावर जागरण गोंधळ आंदोलन मोबदला वाटपाची संपूर्ण चौकशीची मागणी
प्रतिनिधी
पुरंदर दि. ७ पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत जमिनीच्या मोबदला वाटपाबाबत चौकशी करून कथित गैरव्यवहार उघडकीस आणावेत, या मागणीसाठी सासवड येथील प्रशासकीय इमारतीसमोर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्यावं वतीने आज जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
अनेक जणांच्या जमिनीच्या मालकी हक्कासह वारस नोंदी, संमतीपत्र आणि मोबदला वाटपाच्या प्रक्रियेबाबत निवेदनातून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मूळ मालकाच्या वारसांना मिळणाऱ्या मोबदल्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शामकांत भिंताडे, रघुनाथ कामठे, लता कामठे आणि लक्ष्मण झुरंगे यांनी केले होते. आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते, पंचायत समितीचे माजी उपसभापती निलेश जगताप आदींनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवत पाठींबा दिला. तर पुरंदर आरपीआय (आठवले गट ) चे अध्यक्ष बळीराम सोनवणे, ग्राहक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष महेश राऊत यांनी पाठींबा देत आंदोलनात सहभाग घेतला होता. याशिवाय इतरही अनेक शेतकऱ्यांनी
आपल्यावर प्रांत कार्यलयाकडून होत असल्याच्या अन्यायाची चोकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यावेळी मयुर फडतरे, दादा झुरंगे, सुजाता जाधव, सागर जगताप, अनेक अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते. सकाळी ११ वा. सुरु झालेले आंदोलन दुपारी २ वाजता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दूरध्वनीवरून येत्या आठ दिवसात याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगीत करण्यात आले.
प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार संदीप पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.




