पुरंदर विमानतळ भुसंपादन व वाटपात प्रचंड हेराफेरी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे शुक्रवारी प्रांत कार्यलयावर जागरण गोंधळ आंदोलन
प्रतिनिधी
पुरंदर दि. ५ पुरंदर तालुक्यातील अंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात येत असलेल्या भुसंपादन व मोबदला वाटपात प्रचंड हेराफेरी होत असून अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करून शासनाने या संपूर्ण प्रक्रियेची सक्षम यंत्रनेमार्फत चौकशी करावी. या मागणीसाठी येत्या शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी प्रांत कार्यालयासमोर अन्यायग्रस्त शेतकरी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी शामकांत उर्फ सुभाष भिंताडे, रघुनाथ कृष्णाजी कामठे, लता रघुनाथ कामठे, लक्ष्मण बाळासाहेब झुरंगे, मयूर फडतरे यांनी दिली.
पुरंदर तालुक्यात शासनाचे बहुचार्चित छत्रपती संभाजी राजे अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. तालुक्यातील उत्तर पूर्व परिसरातील पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी, कुंभारवळण, वनपुरी या गावातील जमिनीचे भुसंपदांनाची प्रक्रिया सुरु आहे. शासनाने शेतकऱ्यांना एकरी सुमारे १ कोटी ६१ लक्ष रुपयांचा घसघशीत मोबदला ही देऊ केला आहे. सद्या संमतीधारक शेतकऱ्यांना मोबदला वाटपाचे काम युद्धपातळीवरून सुरु आहे. मात्र या मोबदला वाटपात एजंटांच्या माध्यमातून मोठी हेराफेरी होत आहे. मोबदला वाटपात जाणीवपूर्वक वाद वाढवून गोंधळ निर्माण केला जात आहे. यातून अर्थपूर्ण व्यवहार केले जात आहेत. महसूल विभागाकडून यातून सर्वसामान्यांना नाहक त्रास दिला जात आहे. हक्काचा मोबदला जाणीवपूर्वक अडवला जात आहे. तडजोड करून ही वाद वाढवून अडवणूक केली जात असून अनेक शेतकरी वारंवार महसूल विभागाचे दरवाजे झीजवत आहेत. याबाबत शेतकऱ्यांच्या हरकती असताना ,प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना, मोबदला वाटपास स्थगिती आदेश असतानाही न्याय मिळण्याऐवजी अन्याय होत असल्याचा आरोप शिवरी, ता. पुरंदर येथे पत्रकार परिषदेत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
या संदर्भात शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे करमाळा विधानसभेचे आ. नारायण पाटील यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी ही या संपूर्ण प्रकरणात लक्ष घातले आहे. त्यांनी ही पत्राद्वारे येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रकार तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे. असे ही राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी अध्यक्ष शामकांत भिंताडे यांनी सांगितले.
आ. पाटील यांनी ही पुरंदर प्रांत कार्यालयाला सण २०२३ ते २०२६ कालावधीत उप विभागीय अधिकाऱ्यांकडे सादर झालेल्या अपील प्रकरणे, त्यांची सध्यस्थिती, तसेच निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांच्या निकाल व आदेशाच्या प्रती, विमानतळ बाधित गावातील बाधित शेतकऱ्यांच्या वाटपाची गाव निहाय मोबदला वाटप यादी तसेच लाभार्थी निहाय तपशील व निवाड्याच्या प्रती, प्रकल्प बाधित गावांतून प्राप्त झालेल्या तक्रारी, दावे, प्रकरनांवर करण्यात आलेली कारवाई, सद्यस्थिती तसेच निकाली प्रकरणाचे निकाल व आदेशाच्या प्रती आदींची माहिती तातडीने मागितलेली आहे.
अन्यायग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने येत्या ६ नोव्हेंबर रोजी सासवड येथील प्रांत कार्यालयावर येतील असा दावा ही या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.




