शिक्षक अडकले ऑनलाईन कामांत; अध्यापनाकडे मात्र दुर्लक्ष !
प्रतिनिधी
पुणे दि. ४
प्राथमिक शिक्षकांना दैनंदिन अध्यापनाव्यतिरिक्त एवढी भरमसाठ ऑनलाईन कामे देण्यात येत आहेत की, विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांचा दिवस मोबाईल-लॅपटॉपवर माहिती भरण्यातच जात आहे.
विविध संस्था व डायट मार्फत ऑनलाईन,ऑफलाईन, लिंक किंवा एक्सेलशीटद्वारे शिक्षकांकडून दररोज नवनवीन माहिती मागवली जाते.
त्यात भर म्हणजे आकस्मिक आदेशांद्वारे दिवसातून दोन-तीन वेळा तातडीची आकडेवारी मागवली जाते. महिन्यातून जवळपास १७-१८ दिवस असे आदेश शिक्षकांवर व्हॉट्सॲपद्वारे धडकवले जातात.
परिणामी शिक्षकांचा बराचसा वेळ झेरॉक्स, यादी, अहवाल, एक्सेलशीट यात खर्च होतो; वर्गात शिकवण्यासाठी वेळ उरत नाही.
सकाळी शाळेत वर्ग सुरु करायला जावे,तोच व्हॉट्सॲपवर नवी लिंक येते.ती लगेच भरली नाही तर वरुन फोन येतो.विद्यार्थी वर्गात बसलेले, पण शिक्षक मात्र स्क्रीनवर अडकलेले. असे चित्र सध्या सर्वच प्राथमिक शाळेमध्ये पाहायला मिळत आहे.
सकाळी एक मागणी पूर्ण केली की दुपारी नवी मागणी. या सततच्या ऑनलाईन कामांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वारंवार माहिती मागवण्यावर निर्बंध आणावेत,अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे.
“शंभर ते दीडशे प्रकारच्या ऑनलाईन माहिती शिक्षकांना भरावी लागते.यात निपुण मूल्यांकन,निपुण पुणे ,एक पेड माॅं के नाम,स्वच्छ विद्यालय,ड्रॉप बॉक्स,
शालेय पोषण आहार, साक्षरता मोहिम, पालक सभा, परीक्षा केंद्र, निपुण भारत, माय भारत, यू-डायस अपडेट, दिक्षा ॲप, विविध पोर्टल्स शासन योजना या माहित्या वारंवार मागितल्या जातात.अशी माहिती पुणे जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी दिली आहे.
“वर्गात मुलं बसलेली असतात,आम्हाला मात्र मोबाईलवर माहिती भरावी लागते.नाहीतर लगेच व्हाट्सअप वर माहिती भरण्यासाठी मेसेज येतो.”असे पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले
तर “एखाद्या दिवशी सकाळी माहिती दिली, तर दुपारी नवी मागणी.शिकवण्यापेक्षा कागदपत्रं व लिंक भरण्यातच शिक्षक व मुख्याध्यापकांचा बहुतांश वेळ जातो.”पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर यांचे म्हणणे आहे.
“गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना वर्गात वेळ हवा.ऑनलाईन कामांच्या ओझ्यामुळे अध्यापन मागे पडतंय. प्रशासनाने यावर नियंत्रण आणायलाच हवं.”अशी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नारायण कांबळे यांची मागणी आहे.
“गेल्यावर्षी ३० सप्टेंबर २०२४ रोजी आम्ही सामूहिक रजा घेऊन ‘ऑनलाईन कामे कमी करा’ म्हणून पुण्यात सर्व शिक्षक व शिक्षक संघटनांनी एकत्रितरीत्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पण त्यानंतर कामे कमी न होता उलट वाढली आहेत. पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी सांगितले.




