जेजुरीचा मर्दानी दसरा, १८ तास रंगला सोहळा
प्रतिनिधी
जेजुरी, दि. ३ तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा मर्दानी दसरा काल जल्लोषात साजरा झाला. तब्बल १८ तास रंगलेल्या हा सोहळा हजारो भाविकांना वेगळीच अनुभूती देवून गेला.
नवरात्राची सांगता आणि घराघरातील घट उठल्यानंतर जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी, तसेच सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलून गेला होता. सायंकाळी ६ वाजता पेशव्यांच्या इशारतीने सोहळ्याला प्रारंभ झाला. भंडार्याच्या उधळणीत खांदेकरी मानकर्यानी देवाच्या उत्सव मुर्तीची पालखी उचलली, भंडार्याच्या उधळणीत देवाचा जयघोषात पालखीने गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालीत पालखी बालदारीत नेण्यात आली. भांडारगृहातून देवाच्या उत्सव मूर्ती सेवेकर्यांनी पालखीत ठेवल्या, सोहळ्याने सीमोल्लंघणासाठी गडकोटाबाहेर बंदुकीच्या फैरींच्या सलामीत कूच केले. उपस्थित भाविकांनी यावेळी मुक्त हस्ताने भंडार्याची उधळण केल्याने मावळतीला गडकोटाला सुवर्ण नगरीचे स्वरूप आले होते. मुख्य प्रवेशद्वारातून सोहळा गडकोटा बाहेर आल्यानंतर गडाला प्रदक्षिणा घालून सोहळा रमण्याकडे निघाला. गडाच्या पाठीमागील बाजूस सोहळा विसावला. रात्री ७.३० च्या दरम्यान या ठिकाणी टेकडीवर व डोंगराच्या उतारावर महिला, अबालवृद्ध व भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, रात्री ९ वाजता मार्तंड भैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा ही सीमोल्लंघणासाठी निघाला. दोन्ही मंदिराच्या मध्ये जयाद्रीची डोंगररांग असल्याने संपूर्ण डोंगरावर दोन्ही कडील विश्वस्त मंडळाकडून विजेचे तात्पुरते खांब उभे करून पुरेशा उजेडाची सोय केली होती. यामुळे संपूर्ण डोंगरावरील विद्युत रोषणाई मनमोहक दिसत होती, दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होती. रात्रीच्या वेळी या सोहळ्यातील जल्लोष मर्दानी अनुभूती देत होता. यातच पालख्या समोर होणार्या विविधरंगी शोभेच्या दारूकामामुळे तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सोहळ्याला एक ऐतिहासिक स्वरूप लाभले होते. शोभेच्या दारूकामाच्या लख्ख प्रकाशात जेजुरी गडाची पालखी डोंगर उतारावरून खाली दरीत रामण्याकडे उतरत होती, तर कडेपठार पालखी सुसरटिंगीच्या टेकडीवर चढत होती. पूर्णपडे डोंगराळ भाग असल्याने खांदेकर्यांना पालख्या सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती, त्यांच्या मदतीला धावणार्या हातांना ही चढ उतारावर कसरत करावी लागत होती, मात्र उत्सवाचा जल्लोष आणि फटयांच्या आतिष बाजीमुळे सारे काही सहजगत्या चालू होते, यावेळी वीरश्री चा वेगळाच अनुभव उपस्थित भाविकांना येत होता.
पहाटे २ वाजण्याच्या सुमारास दोन्ही पालख्यांची देव भेट सोहळा उरकला. आणि सोहळ्यांनी माघारीचे प्रस्थान ठेवले. आपटा पूजन केल्यानंतर जुन्या जेजुरी मार्गे सोहळ्याने गडकोटाकडे प्रस्थाने ठेवले. ग्रामप्रदक्षिणा केल्यानंतर सकाळी ७ वाजता सोहळा गडावर पोहोचला. रोजमुरा वाटपानंतर सोहळ्याची सांगता झाली.
या नंतर सुरू झाल्या खंडा( तलवार) कसरत स्पर्धा. दसरा उत्सवातील युवा वर्गाचा अत्यंत प्रिय सोहळा सुरू झाला सुमारे ४० किलोचा खंडा जास्तीत जास्त वेळ पेलून धरणे, त्याच्या कसरती करणे या स्पर्धेत सुमारे ६१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातील जास्तीत जास्त वेळ खंडा तोलून धरण्याच्या स्पर्धेत रमेश शेरे याने १३ मी.२८ सेकंद येवढा वेळ खंडा तोलून प्रथम क्रमाक मिळवला, अंकुश गोडसे (१३ मी.२६ से.) हेमंत माने (८ मी. ४३से.)यांनी अनुक्रमे दूसरा व तीसरा क्रमांक पटकावला.
खंडा स्पर्धा विजेते पुढीलप्रमाणे
खंडा तोलणे
१) रमेश शेरे – ५१००० रु.व चषक
२) अंकुश गोडसे – ३५०००रु. व चषक
३) हेमंत माने – २५०००रु. व चषक
४) मंगेश चव्हाण – २०००० रु.व चषक
५) सुहास खोमणे व गिरीष घाडगे – 10000 रु. व ट्रॉफी
उत्तेजनार्थ – प्रतीक खोमणे – ५००० रु. व ट्रॉफी
खंडा कसरत
१) नितीन कुदळे – ५१००० रु. व चषक
२) अक्षय गोडसे – ३५०००रु. व चषक
३) शिवाजी राणे – २५००० रु. व चषक
४) शिवम कुदळे – २००००रु. व चषक
५) सचिन कुदळे – १०००० रु. व ट्रॉफी
उत्तेजनार्थ-
विशाल माने – ५००० रु. व चषक
स्वप्नील शिंदे – ५००० रु. व चषक.
यावेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त पोपट खोमणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौन्दडे, अड पांडुरंग थोरवे, अड विश्वास पाणसे, अभिजित देवकाते समस्त ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सुधीर गोडसे आदि.पदाधिकारी उपस्थित होते.




