जेजुरीच्या ग्रामदेवता जानाई देवी पालखी सोहळ्याचे निवकनेकडे प्रस्थान

जेजुरीच्या ग्रामदेवता जानाई देवी पालखी सोहळ्याचे निवकनेकडे प्रस्थान

जेजुरी, दि. १२ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीची ग्रामदेवता जानाई देवीचा पालखी सोहळ्याने आज सायंकाळी ६ वाजता निवकने जि. सताऱ्याकडे प्रस्थान ठेवले. यावेळी देवीचे भक्त, आजीमाजी पदाधिकारी, मानकरी, देवसंस्थान चे विश्वस्त, हजारोंच्या संख्येने जेजुरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
कुलदैवत खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्रामदैवता जानाईदेवी हे जेजुरीकर नागरिक व खंडोबा भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जानाई देवीचे मुळस्थान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुर्गम डोंगर दरी खोऱ्यातील निवकने येथे आहे. तीनशे वर्षापूर्वी जानाई भक्त नागू माळी यांनी जेजुरी ते निवकने पायी पालखी सोहळा सुरु केला . हि परंपरा कायम ठेवत या पालखी सोहळ्याला भव्य स्वरूप देण्यात आले आहे. जेजुरी ते निवकने सुमारे दीडशे किलोमीटर डोंगर दर्यातून हा सोहळा मार्गस्थ होत असतो या सोहळ्यात हजारो जेजुरीकर भक्त सहभागी होत असतात.

दि ८ मार्च रोजी जानाईदेवी पालखी सोहळ्याचे मानकरी नागनाथ झगडे यांच्या निवास स्थानातून जानाई देवींचा पालखी सोहळा काढण्यात आला.महाशिवरात्र निमित्त हा सोहळा जेजुरी गडावर जावून खंडोबा देवाची देवभेट घेण्यात आली. देवभेटी नंतर वाजत गाजत हा सोहळा आप्पासाहेब बारभाई ( मेंडके वाडा ) यांच्या निवास स्थानी विसाविण्यात आला होता. गेली तीन दिवस येथ भजन कीर्तन महापूजा तसेच महाप्रसाद आदीची सुविधा गोल्डन स्पोर्ट्स क्लब व अखिल कोल्हाटी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

आज मंगळवारी दि १२ ग्रामस्थांच्या वतीने जानाईदेवीची पूजा अभिषेक होवून दुपारी पालखी सोहळा जेजुरीतून वाजत गाजत निघाला
सायंकाळी ६ वाजता शिवखिंड येथे देवीच्या परडीचे पूजन व समाज आरती होवून हा पालखी सोहळा निवकनेकडे मार्गस्थ झाला.
आज या सोहळ्याचा मुक्काम वाल्हे जवळील कामठवाडी, दि १३ रोजी सकाळी नीरा नदीवर स्नान होवून सोहळा सालपे, दि १४ रोजी वडूथ ( आंबा ) दि १५ श्रीक्षेत्र माहुली संगम ,दि १६ रोजी ताराळे येथे मुक्काम होणार आहे . दि १७ रोजी कावदरा येथे निसर्ग पूजन होवून सोहळा निवकने येथे पोहोचणार आहे. दि १८ रोजी पहाटे धारेश्वर येथे उत्स्वमुर्तीना स्नान घालून निवकने मंदिरात पूजा अभिषेक होवून यात्रेचा चौक भरण्यात येणार आहे. दि १९ रोजी चौक फुटून यात्रेची सांगता होवून जानाई देवी पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु होणार असल्याचे सोहळा प्रमुख नागनाथ झगडे,दीपक खोमणे,दत्तात्रय खोमणे,मयूर खोमणे,रमेश सोनावणे यांनी सांगितले.

या पालखी सोहळ्यात श्री जानाईदेवी पालखी सोहळ्याच्या वतीने या पदयात्रा पालखी सोहळ्यात भाविकांना आनन्दान,पाणी ,आरोग्य सेवा तसेच निवकाने येथे सुमारे पन्नास हजार भाविकांना अन्नदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे ट्रस्टचे प्रमुख शिवाजी कुतवळ यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page