जेजुरीत येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष.. तीन लाखावर भाविकांची जेजुरीत गर्दी
प्रतिनिधी
जेजुरी, दि. १५
अधिक महिन्यातील आणि दीड वर्षानंतर भरलेली सोमवती अमावस्या असल्याने जेजुरीत आज सुमारे तीन लाखावर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. मध्यरात्री नंतर रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत होते.संपूर्ण गडकोट सदांनंदाचा जयघोष आणि भंडार खोबर्याची मुक्त हस्ताने उधळण करीत यात्रा पूर्ण करीत होता.
दीड वर्षानंतर पवित्र अशा अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोमवती अमावस्या आल्याने भाविकांना एक चांगला योग आला होता. यामुळे भाविक मोठ्या संख्येने देवदर्शन करण्यासाठी काल रविवार पासूनच जेजुरीत मुक्कामी येत होता.
रविवारी दुपारी १२ वा २० मी. सोमवती आमवस्येला प्रारंभ होऊन सोमवारी सकाळी ८ वा. २४ मी. पर्यंत पुण्यकाल असल्याने ग्रामस्थांनी रविवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता मल्हारी म्हाळसाकांताच्या पालखी सोहळा काढण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी सूर्योदयाला देवाचे कऱ्हा स्नान उरकणे महत्वाचे असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे राज्यभरातील भाविकाना देवदर्शनाचा एक चांगला योग लाभलेला होता. काल रविवारी दिवसभर अमावस्या असल्याने भाविक जेजुरीत मिळेल त्या वाहनाने येत होते. मध्यरात्रींनंतर २ वाजता पेशव्यांच्या आदेशाने देवाच्या उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. यावेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अड विश्वास पाणसे, विश्वस्त मंगेश घोणे, अड पांडुरंग थोरवे, अभिजित देवकाते, अनिल सौन्दडे, पोपट खोमणे, डॉ. राजेंद्र खेडेकर,व्यवस्थापक आशिष बाठे व देव संस्थान चे कर्मचारी गडावर जातीने उपस्थित होते.
गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने कऱ्हा स्नानासाठी कूच केले. यावेळी देव संस्थानच्या वतीने बंदुकीची फैरी झाडून सलामी देण्यात आली. गडातील, व गडकोटाच्या सज्जातील भाविकांनी ‘येळ कोट येळकोट जय मल्हार’ , तसेच ‘सदांनंदाचा येळकोट’ चा जयघोष करीत भंडार खोबर्याची मोठ्या प्रमाणावर उधळण करीत देवाला मान दिला. संपूर्ण गडकोट पिवळ्या जर्द भंडार्यात न्हाऊन निघाला होता.
रात्रीच्या वेळी देवस्थान च्या वतीने पालखी मार्गांवर करण्यात आलेल्या विद्युत रोषनाईत पालखी सोहळा गड कोटातून कऱ्हा स्नानासाठी बाहेर पडला. खांदेकरी, मानकर्यांनी उत्सव मूर्तींची वजनाने खूप जड असणारी पालखी आपल्या खांद्यावर लीलया पेलत गडावरुन शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंच बागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन जानुबाई चौकं मार्गे शिवाजी चौकात सोहळा आला. तेथून कोथळे रस्त्याने सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ झाला. सकाळी ७ वाजता देवाचे पुजारी, ग्रामस्थ मानकर्यांनी उत्सव मूर्तींना विधिवत स्नान घातले. यावेळी नदीवर उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी ही कऱ्हा स्नान उरकून यात्रेचे पुण्य मिळवले. याठिकाणी धालेवाडी ग्रामस्थ आणि रंभाई शिंपीन ट्रस्ट च्या वतीने भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. कोथळे, रानमळा, कोरपडवस्ती, दवणे मळा येथील मान स्वीकारत सकाळी १० वा.सोहळा ग्रामदेवता जानुबाई मंदिरासमोर विसावला. येथे ग्रामस्थांनी उत्सव मूर्तींचे दर्शन घेतले. ११ वाजण्याच्या सुमारास सोहळा गडकोटावर पोहोचला. पेशव्यांनी रोजमारा वाटप करून सोहळ्याची सांगता झाली.
पहाटेच्या वेळी सोमवती यात्रा सोहळा असल्याने काल पासूनच भाविक जेजूरीत देव दर्शनासाठी येत होते. यात्रा सुलभ व चोख बंदोबस्तात व्हावी तसेच वाहतुकीवर तान येऊ नये म्हणून उप विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्ग दर्शनाखाली जेजुरीचे पो.नि. रवीद्र पाटील यांनी २० पोलीस अधिकारी, २०० पोलिस कर्मचार्यासह चोख बंदोबस्त ठेवला होता.
अंधार आणि गर्दीचा फायदा उठवत खिसे कापू, चोऱ्या माऱ्या करणाऱ्या अनेक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तरी ही चोऱ्या होण्याचे अनेक प्रकार झालेच.
मार्तंड देवसंस्थान च्या वतीने येणार्या भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे याचे नियोजन करण्यात आले होते. पालखी सोहळ्याला अडथळे येऊ नयेत म्हणून संपूर्ण पालखी मार्गांवर पुरेशा उजेडाची सोय करण्यात आली होती. सकाळच्या वेळी सोहळ्याला धालेवाडी रेल्वे गेट येथे नाष्टा आणि सोहळा गडकोटात आल्यानंतर भोजनाची सोय करण्यात आली होती. एस.टी.महामंडळाकडून ही जादा बसेस ची सोय करण्यात आली होती.
खंडेरायाच्या धार्मिक विधींमध्ये भंडाऱ्याला मोठे महत्व आहे भंडारा – खोबरे खरेदी करून तळीभंडार करून देवाला अर्पण करणे आणि उधळण करीत देवाच्या नावाने जयघोष केल्याशिवाय येथील विधी पूर्ण होऊच शकत नाहीत मात्र राज्यातुन येणार्या भाविकभक्तांच्या श्रद्धेचा येथे मोठा गैरफायदा घेण्याचा प्रकार होत होता. भेसळ युक्त भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होतं होती. याला यावेळी चांगलाच आळा बसवण्यात प्रशासनाला यश आले होते.




