जेजुरी सोमवती यात्रेत भाविकांच्या ४४ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी
प्रतिनिधी
जेजुरी, २१ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा नुकतीच संपन्न झाली. या यात्रेत प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी ४४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले.
याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक १५ रोजी जेजुरीत खंडोबा देवाची सोमवती यात्रा झाली. या यात्रेसाठी तीन लाखाहून अधिक भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली होती. दिनांक १४ व १५ रोजी गर्दीचा फायदा घेऊन खंडोबा मंदिर,पायरी मार्ग, गौतमेश्वर मंदिर, उभी पेठ, कोथले चौक, कऱ्हा नदी पात्र, तसेच नाझरे जलाशय आदी ठिकाणी चोरट्यांनी भाविकांच्या गळ्यातील ४४ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. जेजुरीत प्रत्येक यात्रेत अशा घटना घडत असल्याने भाविकांच्यात मोठी नाराजी आहे.
जेजुरी येथील मंगेश भोसले यांची दीड टोळ्यांची सोन्याची चैन, तळेगाव दाभाडे येथील तुषार जाधव यांची १४ ग्राम वजनाची चेन, अमळनेर येथील रोहिणी पाटील यांचे मंगळसूत्र, आकुर्डे येथील सुनीता जगताप यांचे मंगळसूत्र, काळेवाडी येथील पूजा नागरगोजे, ४ ग्राम वजनाचे दागिने, कालेपडळ येथील सुचिता पाटील ८ ग्राम वजनाचे गंठण, मुंबई येथील चैतन्य मेहेर ८ ग्रामची चेन, आळंदी येथील ओंकार तनपुरे यांची एक तोळे ची चेन, कोरेगाव भीमा येथील धीरज परदेशी यांची दीड तोळ्यांची चेन, खराडी येथील ओम जाधव यांची दीड तोळे ची चेन, घणसोली येथील प्रकाश म्हात्रे तीन तोळ्यांची चेन, हवेली येथील अमोल घुले यांची १६ग्रामची चेन, मुंबई येथील चंद्रकांत खैरे यांची एक तोळ्यांची चेन, कात्रज येथील रणजीत लव्हाळे यांची दोन तोळ्यांची चेन, आंबेगाव येथील रवींद्र कोकाटे यांची साडे चार तोळेची चेन, भिवंडी येथील रुपेश भोईर यांची पाच तोळे वजनाची चेन, पनवेल येथील आकाश पाटील यांचे सात तोळे ची चेन, वाई येथील स्नेहल बिंदे यांचे एक तोळे चे गंठण, पवई येथील प्रशांत आवारे यांची दोन तोळे वजनाची चेन, गोरेगाव येथील उत्तम माने यांची दीड तोळे ची चेन,आकुर्डी येथील शामल निर्मले यांचे तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र, आदी भाविकांचे सुमारे ४४ तोळे ८ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या सर्वांनी जेजुरी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
दीड वर्षापूर्वी झालेल्या सोमवती यात्रेत ८२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समजते.
दीड वर्षानंतर जेजुरी येथे सोमवती यात्रा भरणार असल्याने भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने असे चोरीचे प्रकार होणार असल्याचे गृहीत धरून नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. चौकात चोरट्यांचे फोटो असलेला फलक लावण्यात आला होता, तसेच स्पीकर वर सातत्याने चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. तसेच सराई गुन्हेगारांना यात्रा अगोदर ताब्यात घेण्यात आले होते. अशी माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.




