शिवरी येथे जनावरांच्या छावणीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट
शिवरी येथे जनावरांच्या छावणीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट
भारतीय जैन संघटना यांच्या वतीने छावणी सुरू
जेजुरी, दि.१६ शिवरी (ता. पुरंदर) येथे भारतीय जैन संघटना यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या छावणीला पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांची चर्चा केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत,गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, शिवरीचे विभागाचे मंडल अधिकारी बापुसाहेब देवकर, ग्रामसेवक शीतल भुजबळ,पशुधन विकास अधिकारी विष्णू ठोंबरे,सरपंच प्रमोद जगताप यांच्यासह अनेक अधिकारी, शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवरी येथील नागरिक गेले कित्येक महिने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे तर शेतकरी वारंवार प्रशासनाकडे येथे छावणी, चारा डेपो सुरू करावा यासाठी पाठपुरावा करत आहेत, मात्र प्रशासनाच्या वतीने केंद्रीय पथक ,त्याचप्रमाणे राज्याचे पथक येऊन पाहणी करून गेले परंतु अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.
अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेत येथे छावणी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.सुमारे पाचशे जनावरं या छावणीत दाखल झाली असून जनावरांना निवारा, चारा ,पाण्याची सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली असल्याचे व्यवस्थापक रमेश नवलाखा व अशोक पवार यांनी सांगितले .
या छावणीला या अधिकाऱ्यांनी भेट देत नियोजनाची पाहणी केली व जैन संघटनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी शेतकऱ्यांनी शासनाने या दुष्काळ बाबत कुठलीही उपाययोजना केली नसल्याने या बाबत नाराजी व्यक्त करत शासकीय मदत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला तर जनावरांचा विमा व्हावा, नागरिकांना गावामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे,टॅंकर सुरू करताना होणारा विलंब टाळावा अशा वेगवेगळ्या मागण्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या.तर नाना कामथे आपल्या म्हशीला छावणीत अपघात होऊन दुखापत झाली आहे तरी उपचारासाठी मदतीची मागणी केली.
तर याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या छावणीमध्ये शासनाच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तर पशुवैद्यकीय सुविधाही पुरवण्यात आली असल्याची माहिती दिली.