जेजुरीत दारू पिऊन भाविकांचा राडा, स्थानिकांना बेदम मारहाण
प्रतिनिधी
जेजुरी, दि. १५ सोमवती यात्रेनिमित्त कल्याण तालुक्यातून भाविक जेजुरीत देवदर्शनाला आले होते. येथील जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गोडसे हॉल येथे उतरले होते. यातील काही भाविकांची जोरदार दारू पार्टी झाली. पार्टीतच भाविकांत भांडणे सुरु झाली. भाविकातील भांडणे सोडवण्यासाठी हॉल चे मालक गोडसे सोडवण्यास गेले असता त्यांना ही भाविकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
या मारामारीत जखमी झालेले हनुमंत शंकर गोडसे, प्रवीण हनुमंत गोडसे, राहुल पांडुरंग गोडसे, धनंजय प्रकाश गोडसे, हरिभाऊ शंकर गोडसे, शीतल धनंजय गोडसे, संजय ज्ञानेश्वर तांबे सर्वजण रा. चिंचेची बाग जेजुरी यांसह निलेश कांताराम भिसे, सुरज द्वारकानाथ भोईर, दोघे रा. रायता, ता. कल्याण जि. ठाणे, भूषण किसन रोने, किसन वामन रोने, दोघे पिंपळोली, ता.कल्याण जि. ठाणे, असे जखमी झालेले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ठाणे जिल्ह्यातून ३०ते ३५ भाविक जेजुरीस सोमवाती यात्रेसाठी आले होते. आज दुपारी ३ च्या दरम्यान यातील काही भाविकांनी नशापान केले. यातून त्यांच्यात भांडणे सुरु झाली होती. भांडण वाढू लागल्याने हॉल चे मालक राहुल गोडसे आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. भाविकांनी त्यांनाच दगड आणि दांडक्यांनी मारहाण केली. मारहाण करून हे भाविक पळून जात असताना स्थानिकांनी जेजुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पळून जाणाऱ्यांना स्थानिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दगडफेक केली
यामुळे स्थानिकही जखमी झाले आहेत. या गडबडीत घटना स्थळी पोलीस पोहचेपर्यंत काही भाविक पळून गेले आहेत. तर काही भाविकांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मारहानीच्या प्रकारानंतर पोलिसांनी जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. रात्री उशीरापर्यंत जेजुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे कामं सुरु होते.
नागरिकांत प्रचंड संताप
गेल्या महिनाभरात जेजुरीत येणाऱ्या भाविकांकडून स्थानिकांना मारहाण करण्याचे दोन तीन प्रकार झाले आहेत. घटनास्थळी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स, रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला होता.
यामुळे जेजुरीकरांत प्रचंड संताप आहे. देव दर्शनासाठी येथे येणारे भाविक दारू पिऊन डीजे व वाद्याच्या तालावर धिंगाणा घालतात. यामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे. ग्रामस्थांनी या दोन्ही वर जेजुरी पोलिसांकडून बंदी आणावी अशी मागणी होत आहे.




