जेजुरी औद्योगिक वसाहतीत कारखानदारांची मनमानी, प्रशासनाचे दुर्लक्ष, जिसा कडून आंदोलनाचा ईशारा
जेजुरी औद्योगिक वसाहतीत कारखानदारांची मनमानी, प्रशासनाचे दुर्लक्ष, जिसा कडून आंदोलनाचा ईशारा
जेजुरी ,दि.२४ तीर्थक्षेत्र जेजुरी येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार किंवा उद्योजकांवर प्रशासनाचा कोणताही अंकुश राहिलेला नसून मनमानी पद्धतीने अनेक बेकायदेशीर पणे कारखानदार व उद्योजक आपले काम करीत आहेत नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असून कुशल अकुशल महिला व पुरुष कामगारांना आरोग्यासह सोयीसुविधा ,कामाच्या वेळा ,आदींबाबत पिळवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असून स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरच्या ठेकेदाराना येथे विविध सेवा पुरविण्याचे काम दिले जाते. कारखानदार तुपाशी आणि भूमिपुत्र उपाशी अशी येथील अवस्था झालेली आहे याबाबत औद्योगिक विकास महामंडळ जेजुरी शाखेसह सर्व कारखान्यांना निवेदन देण्यात आले असून पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात यावे अन्यथा जिसा संघटनेसह संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन व कारखानदार राहतील असा इशारा पत्रामध्ये देण्यात आला आहे , या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष तथा जिसा संस्थेचे अध्यक्ष संदीप जगताप ,संपत कोळेकर ,महेश उबाळे ,नजीर शेख ,अजय जगताप ,विक्रम फाळके,विकास झगडे, बाळासाहेब जरांडे ,महेश ढमाळ ,विकास पवार ,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जेजुरी एमआयडीसी मध्ये कंपनीच्या गेटबाहेर धोकादायक पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग केले जाते .तसेच अवजड वाहने रस्त्यावर लावल्यामुळे मोठे अपघात झाले आहेत .यामध्ये काही कामगार मृत्यूमुखी पडले असून काहीजण कायमचे अपंग झाले आहेत.गरजवंताला प्लॉट न देता काही कारखानदारांना पाच ते सहा प्लॉट वितरित करण्यात आले आहेत तर काही उद्योजकांनी १०वर्ष होऊनही उत्पादन सुरू न करता ते बंद ठेवले आहेत .काही उद्योजक मनमानी पद्धतीने काम करत असून कामगारांची पिळवणूक होत आहे . कामगार कायद्यानुसार किमान वेतन दिले जात नाही महिलांना आरोग्याच्या सोयी सुविधा नाहीत .कामगारांच्या वाहनांना सुरक्षित पार्किंग नाही ,रस्त्यावर धोकादायक वाहने लावलेली असतात ,कंपनी मध्ये चहा ,अल्पोपहार ,अपघात विमा आदी सुविधा नाही .किंवा वैद्यकीय तपासण्या करण्यात येत नाहीत कामांच्या तासांचे मूल्यमापन नाही स्थानिकांना डावलून बाहेरच्या ठेकेदारांना पोसण्याचे काम केले जाते ज्या शेतकऱ्यांने उद्योगासाठी जमीन दिली आहे त्याच्या घरातील व्यक्तींना नोकरी नाही , कामगार हा माणूस नसून यंत्र आहे अशी वागणूक दिली जात असल्याच्या अनेक महिलांच्या तक्रारी आहेत . या सर्व तक्रारींचे निवारण व्हावे ,एमआयडीसी कार्यालयाने कारखानदार उद्योजक यांच्यावर अंकुश ठेवावा व कामगारांना सोयी सुविधा मिळणे बाबत व त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून निवेदनाची प्रत पोलीस ठाण्यात दिली असल्याचे संदीप जगताप यांनी सांगितले .