स्वतःचे खापर दुसऱ्याच्या माती फोडण्याचा पराक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला आहे.- पंकज धिवार
प्रतिनिधी
पुरंदर दि. १८ पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील जिल्हा परिषदेकडून चालवण्यात येणाऱ्या “ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल” या शाळेच्या नावबदलावरून व विविध प्रशासकीय निर्णयांवरून वाद निर्माण झाला असून या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. संबंधित शाळेला “ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल” या नावाने परवानगी असतानाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी परस्पर निर्णय घेत शाळेचे नाव “ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा” असे बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतःवरचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा पराक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे करत असून गटशिक्षणाधिकारी गोविंद लाखे यांना निलंबन करून स्वतःचा बचाव करीत आहेत.
दरम्यान, या शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात स्थानिक खासदार सुप्रिया सुळे यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. तसेच स्टेजवरील बॅनरवर स्थानिक लोकप्रतिनिधी विजय शिवतारे यांचे नाव नसल्याचेही निदर्शनास आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनाही भाषणाची संधी न दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम शासकीय असतानाही सर्व पक्षांच्या तालुका अध्यक्षांना निमंत्रण व पास देणे अपेक्षित असताना काही पक्षांना निमंत्रणच देण्यात आले नसल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी केला आहे.
यासोबतच, शाळेच्या मान्यतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित शाळेला यु-डायस (U-DISE) क्रमांक नसताना उद्घाटन कसे करण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात विचारणा केल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नसल्याचेही सांगण्यात आले.
शाळेचे नाव ज्योती सावित्री ठेवताना महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक विचारांचा संदर्भ देण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात गरीब, वंचित व दलित घटकांतील विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रमाणात प्रवेश मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उलट, यापूर्वी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या सर्व प्रकरणात जबाबदारी झटकण्यासाठी गटशिक्षणाधिकारी गोविंद लाखे यांच्यावर दोषारोप टाकण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यु-डायस क्रमांकाबाबत वस्तुस्थिती प्रसारमाध्यमांसमोर मांडल्यामुळेच गोविंद लाखे यांना जातीय द्वेषातून निलंबित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर, येत्या काळात जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून तालुक्यात प्रवेश प्रक्रियेबाबत जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याचे पंकज धिवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना पदावरून हटवण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
या प्रकरणामुळे तालुक्यातील शैक्षणिक व राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.




