पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील शाळेबद्दल अधिकृत माहिती नाहीच. मात्र पुरंदर च्या गट शिक्षणाधिकाऱ्याचे निलंबन, जिल्हा परिषदेच्या सीओ चा प्रताप
प्रतिनिधी
पुरंदर , दि. १६ पुरंदर तालुक्यातील खाणवडी येथील ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा या शाळेच्या मान्यतेबाबत, तसेच प्रवेश प्रक्रिया याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडून ही कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. केवळ सदर शाळेबाबत बदनामीकरक माहिती बाहेर प्रसारित केल्याचे गैरवर्तन असल्याचे सांगत निलंबन केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
गेले दोन दिवस पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील सी.बी.एस.सी.बोर्ड असणाऱ्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेबाबत प्रसार माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.
पत्रकार परिषदेत त्यांनी शाळेबाबत माहिती देण्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेची बदनामी केल्यामुळे पुरंदरच्या गट शिक्षणाधिकारी गोविंद लाखे यांचे निलंबन केल्याचीच माहिती दिली.
गरीब होतकरू विध्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा बाबत येथील विध्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया, प्रवेशाबाबत असणारे निकष आणि शाळेच्या मान्यतेबाबत त्यांच्याकडून माहिती मिळू शकली नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून ३० सप्टेंबर २०२५ रोजी ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कुल साठी पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे स्वयंसहायता तत्वावर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याचे पत्र पत्रकार परिषदेत सादर करून हीच मान्यता असल्याचे सांगितले. मात्र याच परवानगी पत्रातील अटी व शर्थी मधील महाराष्ट्र स्वयं अर्थ सहाय्यता शाळा अधिनियम २०१२ अन्वये निर्धारित केलेल्या मानकांचे अटी व शर्तीचे तसेच शासकीय निदेशांचे पालन झाले की नाही याबद्दल त्यांच्याकडून माहिती मिळाली नाही. २०२५ साली शाळेचे नाव आणि उदघाटन झालेल्या शाळेचे नाव वेगळे आहे. असे असताना आजच्या नावाने झालेल्या बदलाबाबत आणि त्यानुसार शाळेच्या मान्यतेची तसेच यु डायस क्रमांकबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी काहीही माहिती देऊ शकले नाहीत. शाळेचा यु डायस क्रमांक पुढील आठ दिवसात येईल एवढीच जुजबी माहिती आजच्या पत्रकार परिषदेत मिळू शकली. यु डायस नंबर नसताना प्रत्यक्ष राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही अंधारात ठेवून कार्यक्रम उरकणाऱ्या मुख्य कार्यकारी आशिकाऱ्याचे निलंबन कोण करणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
दरम्यान पुरंदर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री लाखे यांची काहीही चूक नसताना त्यांच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील याने निलंबनाची कारवाई केल्याचे वृत्त पुरंदर तालुक्यात पसरल्याने विविध राजकीय, सामाजिक संघटनानी निषेध केला आहे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्याचा बळी दिला असल्याची चर्चा आहे.स्वतःचे अपयश आणि स्वतःवर शेकणारे प्रकरण एका कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या माथी मारून पाटील मोकळे झाल्याचे जिल्हा परिषदेत मोठीं चर्चा आहे.




