डॉ. बेबी कोलते व प्रा. संगीता पवार यांचा विध्यार्यांकडून गौरव
जेजुरी महाविद्यालयात ‘ कृतज्ञता ज्ञानार्जनाची’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन
जेजुरी, दि. ५ (प्रतिनिधी) शरदचंद्रजी पवार महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी प्राध्यापक डॉ. बेबी कोलते आणि प्रा. संगीता पवार यांच्या बहुमोल शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यासाठी लिहिलेल्या ‘कृतज्ञता ज्ञानार्जनाची’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष विजयदादा कोलते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, माजी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या साक्षीने या गौरव सोहळ्याने महाविद्यालयाच्या इतिहासात एक सोनेरी पान जोडले.
विजयदादा कोलते यांनी आपल्या भाषणात डॉ. बेबी कोलते यांच्या संघर्षमय वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी, जिचे आई-वडील अशिक्षित, पण भाऊ शिवाजी कोलते यांच्या मार्गदर्शनामुळे तिने पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच त्या अध्यापन क्षेत्रात अतुलनीय योगदान देत आहेत.
विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, कमवा-शिका योजना, सांस्कृतिक विभाग, परीक्षा विभाग यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्या लढल्या, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत कार्यरत राहिल्या, म्हणूनच आज विद्यार्थ्यांनी त्यांचा हा अनोखा सन्मान केला.
प्रा. संगीता पवार या बारामतीतील प्रतिष्ठित पवार कुटुंबातील असून, त्यांनी नियुक्तीनंतर अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर दिलेला भर आणि त्यांचे मार्गदर्शन यामुळे आज त्या अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा दीप उजळणाऱ्या दोन तेजस्वी मार्गदर्शकांचा हा सन्मान आहे. असे गौरवोद्गार विजयदादा कोलते यांनी काढले.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी आपल्या याच महाविद्यालयातील अध्यापन कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा दिला. “मी जेव्हा इथे प्राध्यापक म्हणून आलो, तेव्हा कोलते मॅडम माझ्या स्टाफमेंबर होत्या. आम्ही महाविद्यालयाकडे एक कुटुंब म्हणून पाहिले. अनेक वेळा आमच्यात बौद्धिक चर्चा आणि वादविवाद रंगायचे. कोलते मॅडम या आपल्या भूमिकेवर ठाम असायच्या. त्या केवळ स्वतःच्या मतावर ठाम नव्हत्या, तर योग्य गोष्टी पटवून देण्यात आणि त्याचा आग्रह धरण्यात त्या नेहमीच आघाडीवर असायच्या. आज त्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना देखील त्यांची तशीच सत्यप्रियता आणि विद्यार्थ्यांप्रती निःस्वार्थ निष्ठा कायम आहे, याचा मला विशेष अभिमान वाटतो,” असे त्यांनी सांगितले. प्रा. सुभाष तळेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले प्राध्यापकांच्या जीवनावर गौरव ग्रंथ लिहिला जाणे हॆ भाग्य महाविद्यालयीन जीवनात फार कमी लोकांच्या वाट्याला येते. बेबी कोलते या माझ्या विद्यार्थिनी आहेत व आज त्यांचा माझ्या उपस्थित गौरव होत आहे हा माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे.
डॉ. बेबी कोलते यांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या या गौरव ग्रंथाबद्दल आपण कृतार्थ झालो आहोत. विद्यार्थ्यांच्या या प्रेम, जिव्हाळा व कृतज्ञतेमुळे विद्यार्थ्यांनी मला आईसाहेब व माई हे जीवनातील सर्वोत्कृष्ट सन्मान व प्रमाणपत्र दिल्याच्या तसेच प्रा. संगीता पवार यांनी विद्यार्थ्यांच्या याच प्रेमामुळे आम्हाला समाजासाठी जगण्याचे बळ मिळाले अशा भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात हिंदी विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या लेखांमधून या दोन्ही प्राध्यापिकांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या संघर्षमय प्रवासाला उजाळा दिला. अनेक विद्यार्थी आपल्या विद्यार्थीदशेतील आठवणी, कोलते मॅडम आणि पवार मॅडम यांनी आपल्यावर केलेले संस्कार, मिळवून दिलेल्या संधी आणि मार्गदर्शनाचे क्षण आठवून भावूक झाले. या गौरव ग्रंथाचे संपादन प्रा. सचिन जगताप, अभिजीत बारभाई, सागर झगडे व कादंबरी नलावडे यांनी केले.
या वेळी माजी प्राचार्य डॉ. सुभाष तळेकर, सचिव शांताराम पोमण, प्रभारी प्राचार्य डॉ. धनाजी नागणे, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दादासाहेब बाठे, प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. लहुजी कदम, जगन्नाथ झेंडे, अरुण खेनट, कवी अनिल कदम, तानाजी झेंडे, जयश्री टिभे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, दोन्ही प्राध्यापिकांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक प्रा.डॉ. सचिन जगताप यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.संतोष तांबे यांनी तर आभार कादंबरी नलावडे यांनी मानले.,