साक्षरतेची वारी, पंढरीच्या दारी शिकाय संधी आली, घ्या शिकूनी अडाणी राहू नका गावात कोणी
प्रतिनिधी
जेजुरी दि. २५
शिकाय संधी आली, घ्या शिकूनी
अडाणी राहू नका गावात कोणी
बाई अंक घे ग अक्षर घे असा साक्षरतेचा गजर करीत पंढरीकडे जाणारी साक्षरतेची वारी आज जेजुरीत दाखल झाली.
केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत दरवर्षी साक्षरता वारीचे आयोजन केले जाते. सदर “वारी साक्षरतेची” उपक्रमांतर्गत देहू ते पंढरपूर या संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी मार्ग व आळंदी ते पंढरपूर या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग दोन्ही पालखी मार्गावर प्रत्येकी एक साक्षरता रथ प्रचार प्रसार करीत आहे. सदर साक्षरता रथाच्या माध्यमातून दोन्ही पालखी मार्गावरील असाक्षर वारकऱ्यांमध्ये शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी पपेट शो, बाहुली नाट्य, पथनाट्य, साक्षरता घोषणा, साक्षरता गीते, साक्षरता घडीपत्रके, उल्लास उपरणे, उल्लास टोप्या वाटप, उल्लास छत्री वाटप, असाक्षरांची ऑनलाइन व ऑफलाईन नोंदणी इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर वारीचा शुभारंभ सचिंद्र प्रताप सिंह,शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या शुभहस्ते व राहुल रेखावार,संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे व डॉ. महेश पालकर संचालक, शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे, कृष्णकुमार पाटील संचालक, बालभारती पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अलका चौक, पुणे या ठिकाणी करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे प्रचार प्रसार राज्य समन्वयक म्हणून कामकाज संभाजी देशमुख हे करत आहेत.
याप्रसंगी भाऊसाहेब सरक, शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षण शिक्षण संचालनालय योजना म्हणाले, ” वारी साक्षरतेची हा उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत डॉ. महेश पालकर शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला एक महत्त्वकांक्षी उपक्रम असून यावर्षी साक्षरतेच्या वारीला वारकऱ्यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. असाक्षरांच्या नोंदणीचे उद्दिष्ट आम्ही 100% साध्य करणार आहोत.”
श्री गणेश चौक जेजुरी येथे टीम वारी साक्षरतेची यांनी पपेट सादरीकरण, घडीपत्रिका वाटप, साक्षरता गीत सादरीकरण करत साक्षरता वारीचे प्रचार प्रसार करण्याचे कामकाज स्वयंसेवक नागसेन साबळे, हुमायू मोरे, करुणा साबळे, उन्नती साबळे, दीपक भुजबळ ,भारती भगत , अनंता पोकळे, सोनाली चव्हाण, दिपक बडगुजर, राजू जग्गे,सस्ते ज्ञानदेव यांनी केले. नागसेन साबळे यांच्या पपेट सादरीकरणाने सर्व उपस्थित वारकऱ्यांचे विशेष प्रबोधन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सुवर्णस्टार मित्रमंडळ व जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जेजुरी यांनी केले. याप्रसंगी जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे व सहकारी, सुवर्णस्टार मित्रमंडळाचे अध्यक्ष रज्जाक तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते अमोल बेलसरे, राजेश बारभाई, प्रीतम बारभाई व
मोठ्या संख्येने वारकरी व भाविक भक्त उपस्थित होते