कायाकल्प’उपक्रमात बेलसर आरोग्य केंद्र जिल्हात पहिले
प्रतिनिधी
जेजुरी, दि. २० आरोग्य केंद्राची स्वच्छता,या ठिकाणीच्या कर्मचाऱ्यांची रुग्णांशी असणारी वर्तणूक व येथील आरोग्य सेवांमधील अनुभव यातून रूग्ण बरे होण्यास किती मदत होते याचे मूल्यमापन करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या कायाकल्प उपक्रमात पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांने बाजी मारत संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही या उपक्रमात सहभागी झालो होतो.यातून आमचा पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आला असून आम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून या आरोग्य केंद्राला प्रशस्तीपत्रक,सन्मानचिन्ह व दोन लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तर यापुढे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठीही आमचे आरोग्य केंद्र पात्र झाले असल्याचे बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुराधा बो-हाडे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा स्तरीय कायाकल्प टिमने बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन स्वच्छता,रेकॉर्ड, आवश्यक दिली जाणारी रुग्णसेवा,कर्मचा-यांची रूग्णांशी असलेली वर्तणुक,रूग्णालय परिसर स्वच्छता,आयुष गार्डन यासारख्या विविध बाबींची तपासणी केली होती.
यासाठी पुरंदर तालुका आरोग्य अधिकारी,डॉ. विक्रम काळे, बेलसर वैदयकिय अधिकारी डॉ.अनुराधा बो-हाडे, डॉ.प्रविण खचकड यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निर्माण अधिकारी, आरोग्य कर्मचारी, यासर्वांनी विशेष प्रयत्न केले याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




