जेजुरीपुरंदरसामाजिक

जेजुरीतील ऐतिहासिक चिंचेच्या बागेत नगरपालिकेचा बोर्ड लावून भाविकांची लूट ? प्रशासनाने झटकले हात

प्रतिनिधी
जेजुरी ,दि.१९ तीर्थक्षेत्र जेजुरी येथे खंडेरायाच्या देवदर्शन कुलधर्म कुळाचार जागरण गोंधळ आदी विधींसाठी राज्याच्या विविध प्रांतातून भाविकांची गर्दी वाढलेली आहे .विशेषतः चैत्र आणि वैशाख मासात भाविक मोठ्या संख्येने जेजुरीत दाखल होत धार्मिक विधी करतात. ऐतिहासिक चिंचेची बाग व परिसरात भविकभक्त आपले धार्मिक विधी साजरे करतात. या ठिकाणी शाकाहारी व मांसाहारी नैवेद्य ,भोजनावळी होतात. पुरातन परंपरेनुसार मांसाहारी नैवेद्य ,भोजनासाठी कोंबडे ,बकरे या बागेतच चिंचेच्या झाडा नजिक कापले जाते. मात्र ,गेल्या काही महिन्यांपासून बकरे कटाईसाठी स्थानिकांकडून अवाजवी पैशांची मागणी ,धाकधपटशा होत असल्याच्या अनेक भाविकांच्या तक्रारी होत आहेत . बकरे कापून त्यांचे तुकडे करून देण्याचे काम (मक्ता ) वंशपरंपरेनुसार मुलाणी बांधवांकडे आहे. चार दिवसांपूर्वी एका भाविकाला बकरे कापण्यासाठी व मांसाचे तुकडे करून करण्यासाठी १५००रुपयांची मागणी करीत सदरील रक्कमेतून काही भाग नगरपरिषदेला जात असल्याचे सांगितल्याने त्या भाविकाने व्हिडीओ चित्रीकरण करत ते प्रसारित केले .यापूर्वीही अनेक भाविकांनी वर्तमान पत्रांच्या प्रतिनिधींकडे तक्रार केली होती. व्हिडीओ प्रसारित होताच शहरामध्ये खळबळ उडाली .प्रत्यक्ष घटना स्थळाची पहाणी केली असता एका चिंचेच्या झाडाला नगरपरिषदेच्या नावाचा फलक लावून तेथेच बकरे कटाईचे काम करण्यात येत होते .आजूबाजूला सुटलेली दुर्गंधी ,प्रचंड घाणीचे साम्राज्य ,इस्ततः विखुरलेल्या पत्रावळ्या आणि त्यातच पर्याय नसल्याने भाविकांचा सुरू असलेला जागरण गोंधळाचा कार्यक्रम असाच प्रकार होता. याबाबत नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही बकरी कटाईसाठी कोणतीही रक्कम(शुल्क ) आकारत नसून सदरील बोर्ड आम्ही लावलेला नाही , असे स्पष्ट केले. सदरील चिंचेची बाग आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे मालकीचीअसल्याने या संस्थेचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते विजय कोलते यांचेशी संपर्क साधला असता आम्ही वाहन पार्किंगचा ठेका दिला आहे मात्र बकरी कटाईचा व वसूल करण्यात येणाऱ्या अवाजवी रक्कमेचा आमच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.
बोर्ड कोणी लावला ?- समीर मुलाणी यांचे स्पष्टीकरण

जेजुरीमध्ये वंश परंपरेने बकरे कटाईची परंपरा सांभाळणारे आणि धार्मिक विधीतील मानकरी समीर मुलाणी यांनी याबाबत सांगितले की ,जेजुरी नगरपरिषदेचा बाजार कर वसुलीचा ठेका देण्यात येतो त्यातूनच एका बकरी कटाई पोटी ८० रुपये संबधित भाविकांकडून ठेकेदार वसूल करतो , यामाध्यमातूनच मागील काळात नगरपरिषदेचा बोर्ड लावला गेला आहे . नगरपालिकेने आम्हाला विहित आचारसंहिता व दर ठरवून द्यावेत त्या प्रकारे आम्ही कटाईची आकारणी करू असे मुलाणी यांनी सांगितले
स्वच्छता व सुविधा देण्याची जबाबदारी जागा मालकांची – बाळासाहेब खोमणे ,
याबाबत , नगरपरिषदेचे जेष्ठ कर्मचारी बाळासाहेब खोमणे यांनी सांगितले की , पुरातन काळापासून बकरे कटाईसाठी नगरपरिषद आकारणी करत होती.पूर्वी बकरे कटाईची जागा वेगळी होती मात्र, जकात बंद झाल्यानंतर बकरे कटाई शुल्क पूर्णतः बंद झाले आहे.चिंचेच्या बागेत नगरपरिषदेच्या नावाने लावण्यात आलेला अनधिकृत बोर्ड काढण्यात आला असून नगरपरिषदेकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याची सूचना लावण्यात आली आहे.
ऐतिहासिक चिंचेची बाग ही एका संस्थेच्या मालकीची असून त्यांच्याकडून वाहनांचे व भाविकभक्तांच्या धार्मिक विधीपोटी रक्कम वसूल केली जाते त्यांनी हा वसुलीचा ठेका दिलेला असल्याने स्वच्छता व सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी संबधित संस्थेची असल्याचे खोमणे यांनी स्पष्ट केले. मात्र हा बोर्ड लावून कोण वसुली करत होते याबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगण्यात आले.

एकूणच ऐतिहासिक चिंचेची बाग एका शैक्षणिक संस्थेची , या जागेत नगरपरिषदेचा बेकायदेशीर बोर्ड लावून भाविकांची लूट … वाहन प्रवेश कर , चिंचेच्या बागेतील कर , बकरे कटाईची अवाजवी रक्कम देऊनही आणि प्रचंड घाणीच्या साम्राज्यात भाविकांना करावे लागणारे धार्मिक विधी ….
जेजुरीत आंधळे दळतेय आणि कुत्रे पीठ खातेय असाच प्रकार आहे ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page