डॉ. कोळेकर यांनी संजीवनी मराठी यांच्या कविता आणि बालसाहित्याला आपल्या दोन्ही ग्रंथातून न्याय दिला. – प्रा. डॉ. शिरीष लांडगे
प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांच्या ग्रंथाचे प्रकाशन
प्रतिनिधी
जेजुरी, दि. ३ संजीवनी मराठे यांची कविता स्त्री मनाचे नितळ आणि पारदर्शी दर्शन घडविते. त्याचबरोबर ही कविता प्रेम कवितेकडून चिंतनशीलतेकडे ,आत्मशोधाकडे वळताना दिसते. डॉ. कोळेकर यांनी संजीवनी मराठी यांच्या कविता आणि बालसाहित्याला आपल्या दोन्ही ग्रंथातून न्याय दिल्याचे दिसून येते. संजीवनी मराठी यांच्या कविता, बालसाहित्य या लेखन प्रकारातील सृजनशील योगदानाची सखोल चिकित्सा डॉ. कोळेकर यांनी केली आहे. असे विचार प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांनी व्यक्त केले.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या, जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी वाड्.मय मंडळाचे उद्घाटन व प्रा. डॉ.अरुण कोळेकर यांच्या ग्रंथांचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता .
याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कोलते , सचिव शांताराम पोमण, सहसचिव बंडू काका जगताप, प्राचार्य डॉ.महादेव वाळुंज ,प्राचार्य डॉ.धनाजी नागणे ,प्रा. डॉ. अरुण कोळेकर ,प्रा. कल्पना रोकडे , स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते .
याप्रसंगी डॉ. कोळेकर यांनी लिहिलेल्या “संजीवनी मराठे यांची कविता : संदर्भ आणि शोध “व “संजीवनी मराठे यांचे बालसाहित्य : आकलन आणि मूल्यमापन ” या परिस पब्लिकेशन ,सासवड यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय स्थानावरून बोलताना विजय कोलते म्हणाले, डॉक्टर कोळेकर यांनी या दोन्ही ग्रंथातून संजीवनी मराठे यांच्या साहित्याचे केवळ स्तुतीगान न करता त्याचा चिकित्सक आणि विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आलेला आहे .त्यांच्या लेखनातील विविधतेचा, सौंदर्याचा आणि आशय घनतेचा सखोल विचार या ग्रंथात करण्यात आला आहे. त्यांच्या बालकेंद्रीत दृष्टिकोनामुळे, सामाजिक जाणीव मुळे आणि संस्कार क्षमतेमुळे संजीवनी मराठी यांचे साहित्य कालातीत ठरते असा निष्कर्ष डॉ. कोळेकर यांनी या ग्रंथात नोंदविला आहे , असे गौरवोदगार कोलते यांनी काढले.
साहित्याविषयी बोलताना प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज म्हणाले, साहित्य जीवनाचा अनुभव देते त्यातूनच माणसाला दिशादर्शन होत राहते .अनुभव आणि साहित्य एकजीव झाले की त्यातून उत्तम कलाकृती आकाराला येते. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातच साहित्याच्या वाचनाने आणि अभ्यासाने स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणता येतो.
यावेळी शांताराम पोमण , प्रा.डॉ.नारायण टाक ,कुंडलिक मेमाणे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. प्रस्ताविक डॉ. अरुण कोळेकर यांनी मराठी विभागाचा आढावा घेऊन ,पुस्तक लेखनामागील भूमिका मांडली. स्वागत प्राचार्य डॉ. धनाजी नागणे यांनी केले. आभार प्रा. कल्पना रोकडे यांनी मानले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी प्रा.डॉ. अतुल चौरे यांनी केले
यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.




