शालेय पोषण आहार शिजवण्याची जबाबदारी.. “मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची.” – शा.पो.आ.अधिक्षक सपना बिलवाल.
( प्रतिनिधी )
पुरंदर, दि. २१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार माध्यान्ह भोजन (भात)शिजवून देण्यासाठी पुरंदर तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समित्या नेहमीच खबरदारी घेत असतात.
मात्र,गोटेमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी कोणीही व्यक्ती तयार नाही.असा शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांचा रिपोर्ट पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल यांच्याकडे सादर करुन येथील मुख्याध्यापक नंदकुमार चव्हाण यांनी याबाबत मार्गदर्शन मागितले.
पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित राहू नये.याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत,पुरंदर तालुका शालेय पोषण आहार अधिक्षक सपना बिलवाल यांनी गोटेमाळ शाळेला भेट दिली.
‘शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून देणे.ही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांची संयुक्तिक जबाबदारी असून केंद्र शासन व न्यायालयाचे निर्देश देखील तसेच आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने शालेय पोषण आहार शिजवून देण्याबाबतची जबाबदारी टाळता येणार नाही. अन्यथा शालेय पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित ठेवल्यामुळे कर्तव्यात कसूर होऊन कारवाई होऊ शकते.असे बिलवाल यांनी शाळा भेटी दरम्यान सांगितले.
त्यामुळे इतरांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापकालाच आपल्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणिव करुन देण्यासाठी स्वतः पुरंदरच्या अधिक्षकांना शाळेत जावून योजना सूरु करण्यासाठी भाग पाडावे लागल्याची चर्चा शैक्षणिक क्षेत्रात आहे.
तालुका प्रशासनाला कोड्यात टाकून शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना शिजवून देणार नसल्याचा येथील मुख्याध्यापक चव्हाण यांचा जो मनसुबा होता.तो शालेय पोषण अधिक्षकांनी उधळून लावल्याची देखील चर्चा आहे.
याबाबत पुरंदरचे शालेय पोषण आहार अधिक्षक सपना बिलवाल यांच्याशी संपर्क साधला असता,”गोटेमाळ शाळेतील मुख्याध्यापक नंदकुमार चव्हाण यांना त्यांच्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव करुन दिल्यानंतर शालेय पोषण आहार योजना सुरु झाल्याचे सांगितले.” पुरंदरमधील काही शिक्षक वरिष्ठांशी आपले घरोब्याचे संबंध असल्याचे सोशल मिडियावर भासवतात.त्या संबंधाचा वापर करुन अधिकाऱ्यांना वेठीस धरणे,शिक्षकांना विविध लाभांसाठी बोगस दाखले मिळवून देणे,विविध प्रकारचे पुरस्कार मिळवून देण्याचे प्रलोभने दाखवणे अशा उद्योगांमध्ये माहिर असणारे मात्र स्वतःच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ असल्याचे समोर आल्यामुळे प्रशासनाने अशा शिक्षकांच्या शाळांना भेटी देऊन त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी करणे आवश्यक आहे.