सेवानिवृत्त विस्ताराधिकाऱ्याचा शिक्षण विभागात हस्तक्षेप; तक्रारीनंतर खळबळ
प्रतिनिधी
जेजुरी, दि. २ पुरंदर पंचायत समितीतील शिक्षण विभागाच्या कामकाजात नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या शिक्षण विस्ताराधिकाऱ्याकडून सातत्याने हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून याबाबत पुरंदरच्या गटविकास अधिकारी प्रणिता श्रीश्रीमाळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
पंचायत समिती कार्यालयात संबंधित सेवानिवृत्त विस्ताराधिकारी नियमित उपस्थित राहून फाईल्स, शिक्षकांशी संबंधित बाबी,चौकशी तसेच निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हस्तक्षेप करत असून यामुळे प्रशासकीय शिस्त आणि गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सेवानिवृत्त विस्ताराधिकाऱ्याचा हस्तक्षेप तात्काळ थांबवावा व प्रशासकीय शिस्त अबाधित ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत पुरंदरच्या गटविकास अधिकारी प्रणिता श्रीश्रीमाळ व गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता,त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
