ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया – कार्यमुक्ती आदेश काढले आणि लगेच स्थगिती; शिक्षकांमध्ये नाराजी.
प्रतिनिधी
पुणे दि. २० राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतील एक ते सहा टप्प्यांतील ऑनलाईन होणाऱ्या शिक्षक बदल्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या होत्या. सातवा टप्पा पुन्हा अडचणीत सापडला होता.या पेचामुळे बदली झालेले शिक्षकांचे कार्यमुक्ती बाबत निर्णय होत नव्हता.त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी होती.शिक्षक संघटनांनी सातव्या टप्प्यातील सेवाज्येष्ठ शिक्षकांना बदलीत सूट द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली होती.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्ती प्रक्रियेलाही विलंब होत असल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता होती.मात्र आजचा दिवस दिलासा देणारा ठरला. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सकाळीच कार्यमुक्ती आदेश काढण्यात आले. शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी होताच शिक्षकांमध्ये समाधानाची लहर उसळली.
परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. दुपारपर्यंत परिस्थितीत उलटफेर झाला आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविण्यात आले की न्यायालयीन प्रकरणावर पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही शिक्षकाला कार्यमुक्त करू नये.शाळा स्तरावरील सुरू असलेली कार्यवाही तत्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले.
या निर्णयाने शिक्षकांचा उत्साह एका क्षणात मावळला. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शिक्षकांमध्ये पुन्हा एकदा नाराजी आणि अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.




