मठवाडी शाळा पुन्हा वादग्रस्त! गावातील सत्तासंघर्षामुळे शिक्षणावर परिणाम?
प्रतिनिधी
पुरंदर, दि. १७ मठवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेल्या दीड वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे.शाळा म्हणजे शिक्षणाचे केंद्र राहावे,अशी अपेक्षा असताना येथे राजकारण,धार्मिक वाद आणि प्रशासनावर दबाव या सर्वांचा खेळ सुरु असल्याची चर्चा आहे.
बदलीपासून वादाची ठिणगी –
जून २०२३ मध्ये ऑनलाईन बदली प्रक्रियेद्वारे रियाज तांबोळी,विलास दुर्गाडे व उल्का दुर्गाडे यांची मठवाडीत बदली झाली.मात्र विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याने शिक्षक विलास दुर्गाडे यांची अतिरिक्त बदली होणे अपेक्षित होते.मात्र,स्थानिक माजी पदाधिकाऱ्याने राजकीय प्रतिष्ठा टिकवण्यासाठी दबाव आणत तांबोळींचीच गावातून बदली केली. यासाठी आणि त्यांच्या मर्जीतील दुर्गाडे यांची बदली थांबवण्यात आली,असा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.
धार्मिक वाद व पोलिस बंदोबस्त –
या घटनेनंतरही शाळेभोवतीचे वाद थांबले नाहीत. स्वराज्याच्या पहिल्या लढाईची स्मारक असणाऱ्या ऐतिहासिक घुमटालगतचे बांधकाम पाडल्याचा आरोप शाळेवर ठेवण्यात आला. विद्यार्थ्यांना वरिष्ठांची परवानगी न घेता दर्ग्यात नेऊन नमाज पठण घडवून आणल्याचे आणि दर्ग्यात मौलानांनी दिलेली रोकड शाळेच्या खात्यात न जमा करता तत्काळ खर्च केल्याचेही अहवालात नमूद झाले.परिणामी तणाव वाढला आणि पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला.
शाळा व्यवस्थापन समिती स्थापनेवरही वाद –
नुकतीच शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. मात्र ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता समिती तयार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.शिक्षक विलास दुर्गाडे सलग तीन ग्रामसभांना गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे.समितीची रचना पारदर्शक नसल्याने वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याची भूमिका विद्यमान पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष–
या सर्व घडामोडींवर पडदा टाकण्यासाठी माजी पदाधिकारी प्रयत्नशील आहे.मात्र प्रशासन आता या शिक्षकांवर काय कारवाई करणार,याकडे लक्ष लागले आहे.
