“कारवाईच्या भीतीने शिक्षकांचे भावनिक आवाहन – प्रशासनाकडून संयमाचा सल्ला”
प्रतिनिधी
दि. १५
पुरंदर तालुक्यातील अनेक शिक्षकांविरोधात पालक व ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींवर प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समित्यांनी अहवाल सादर केला असून,अनेक तक्रारी योग्य ठरल्या आहेत.परिणामी,दोषी ठरलेल्या शिक्षकांवर प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे.
कारवाईच्या भीतीने काही शिक्षकांनी सोशल मीडियावर भावनिक आवाहन केले आहे.”आमच्यावर अन्याय होत आहे,जाणीवपूर्वक बदनामी केली जाते,आमच्या कामाचे चीज होत नाही,”असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. काही शिक्षकांनी तर पालक व ग्रामस्थांना विनंती करताना,”आमच्याकडून चूक झाली असेल तर माफ करा,मात्र आमच्यावर कारवाई होऊ देऊ नका, फार तर आमच्या बदल्या करा,” अशी मागणी केली आहे.
दरम्यान,काही ठिकाणी शिक्षकांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना आत्महत्येच्या धमक्या दिल्याच्या घटना घडल्यानंतर संघटनांनी प्रशासनाला कळविले. प्रशासनाने समुपदेशन करताना सांगितले की, आत्महत्येच्या धमक्या देणे हा कायद्याने गुन्हा आहे. चौकशी व कारवाईच्या प्रक्रियेला नियमांनुसार सामोरे जाणे आवश्यक आहे.
चौकशी अहवालानंतरही काही शिक्षक कारवाई टाळण्यासाठी गावांमध्ये तणाव निर्माण करीत असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.शैक्षणिक क्षेत्रातूनही अपेक्षा व्यक्त होत आहे की अशा प्रकारांना वेळीच आळा घालावा. सोशल मीडियाचा वापर करून पालकांना वेठीस धरण्याचाच असा प्रकार असून गावापातळीवरून याचे राजकारण केले जात असते. शिक्षकांनी आपल्याला कर्तव्याशी प्रामाणिक राहावे. राजकारणात सहभागी होण्याचा प्रयत्न करू नये.
जाणकारांचे मत आहे की, जर शिक्षक मानसिक तणावाखाली असतील किंवा नैराश्येत गेले असतील तर त्यांचे प्रथम समुपदेशन करणे गरजेचे आहे.
तक्रारदारांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आमच्या तक्रारी विद्यार्थ्यांच्या हितासाठी होत्या.चौकशी समितीने त्या योग्य ठरवल्या आहेत.शिक्षकांनी भावनिक आवाहन करुन गावात गैरसमज पसरवू नयेत. गावात तणाव निर्माण होऊ नये,ग्रामस्थांनी शांतता राखावी. शिक्षकांचे देखील मनोधैर्य खचू देवू नये. त्यांचे समुपदेशनासाठी प्रयत्न करावेत.
संघटना प्रतिनिधी व प्रशासन देखील अशा शिक्षकांचा शोध घेवून संबंधितांचा आत्मविश्वास व मनोबल वाढवण्यासाठी यापूर्वी समुपदेशन केले त्याप्रमाणे प्रयत्नशील असल्याची माहिती मिळाली आहे.




