शिक्षक बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट? सहा टप्पे पूर्ण; सातवा टप्पा पुन्हा पेचात

प्रतिनिधी
पुणे दि. १४ राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या पारदर्शक व्हाव्यात म्हणून शासनाने संगणकीय ऑनलाईन प्रणालीद्वारे सात टप्प्यांत बदल्या करण्याचे धोरण आखले होते. पहिल्या सहा टप्प्यांतील बदल्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असल्या तरी सातवा टप्पा पुन्हा एकदा पेचात अडकला असून बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.
सातव्या टप्प्यात सुगम भागातील सेवाज्येष्ठ शिक्षकांना दुर्गम शाळांमध्ये बदली देण्याचा नियम आहे. यामागचा शासनाचा उद्देश म्हणजे अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या दुर्गम शाळांतील पदे भरून काढणे. मात्र, सेवाज्येष्ठांची सक्तीने बदली करू नये, असा ठाम आग्रह शिक्षक संघटनांचा आहे.
गतवर्षी २४१ सेवाज्येष्ठ शिक्षकांची बदली दुर्गम शाळांमध्ये करण्यात आली होती. मात्र संबंधितांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळवली आणि त्या बदल्या रद्द झाल्या. यंदाही त्याच मागणीवर न्यायालयीन लढाई सुरु असून प्रशासनाने संबंधित शिक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेऊन दुर्गम शाळा शिक्षकांविना राहणार नाहीत,याची दक्षता घ्यावी,अशी मागणी १ ते ६ टप्प्यात सोईस्करपणे बदली झालेल्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

१) शिक्षक संघटनांची मागणी :
सातव्या टप्प्यातील सेवाज्येष्ठांना सूट द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून शिक्षण व ग्रामविकास मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करुन होत आहे.
२) कोंडी वाढली
या कोंडीमुळे एकीकडे दुर्गम शाळा शिक्षकांविना राहतात,तर दुसरीकडे दुर्गम भागातील शिक्षकांची सुटका रखडल्याने नाराजी आहे.
३) शिक्षकांचा संताप
जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत १ ते ६ टप्प्यातील शिक्षकांचे आदेश निघाले; पण केवळ ७ व्या टप्प्यातील शिक्षकांची बदली प्रक्रिया रखडल्याने पुणे जिल्ह्यातील कार्यमुक्ती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.
दरम्यान,

सातव्या टप्प्यात जाण्याची वेळ आलेले सेवाज्येष्ठ शिक्षक स्वतःला दुर्गम भागात बदली होऊ नये म्हणून न्यायालयीन मार्ग,पुढाऱ्यांकडे धाव,तसेच संघटनांमार्फत जोरदार हालचाली करत आहेत. परिणामी ७ वा टप्पा राबविण्यातही अडथळे येत असून पुणे जिल्ह्यात कार्यमुक्ती प्रक्रियेबाबत अनिश्चितता कायम आहे. यामुळे शिक्षक वर्गातून संताप व्यक्त होतं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page