पालखी विसावा स्थळाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष अधिकाऱ्यांचे दौरे कशासाठी?
प्रतिनिधी
जेजुरी, दि. १३ आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर वारी पुर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय हे प्रत्यक्ष पाहणी करून येथील उपलब्ध सुविधा व करायला लागणा-या उपाययोजना याबाबत आढावा घेत आहेत. मात्र हे दौरे होत असताना माऊलींची पालखी विसावा स्थळाना ही भेटी देणे आवश्यक आहे. यापैकी यमाई शिवरीदुपारचा विसावा स्थळ, सकाळचा न्याहारी विसावा बोरावके मळा स्थळ, दुपारनंतर सायंकाळी जेजुरी मुक्कामा आधीचा साकुर्डे फाटा येथील विश्रांती स्थळ आदी ठिकाणची पाहणी करणे ही आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी पाहणी दौऱ्यानिमित्त येणाऱ्यांची वाट पाहत स्थानिक ग्रामस्थ ताटकळत उभे असतात. मात्र या ठिकाणी कोणीही थांबत नाही. यामुळे येथील ग्रामस्थांनातून नाराजी व्यक्त होत आहे.
शिवरी (ता.पुरंदर) येथील विसाव्या कडेतर सर्वजण दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत असून पालखी काळात येथे अपेक्षित सोयीसुविधा उपलब्ध झाल्या नाहीत तर वैष्णवांना याचा त्रास होऊ शकतो.
यमाई शिवरी येथील विसाव्याला विशेष महत्त्व असून अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया आदिशक्ती स्वयंभू यमाई देवी आणि माऊलींच्या पादुका यांचा अलौकिक असा भेट सोहळा या विसाव्या दरम्यान येथे पार पडतो. यावेळी या सोहळ्यासाठी परिसरातील असंख्य गावातून हजारो नागरिक दर्शनासाठी गर्दी करत असतात.
येथे सध्या रस्त्याच्या बाजूला असणारा सेवा रस्ता खचला आहे,एस.टी.निवारा शेडची दुरावस्था झाली आहे तर या भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठी मोरी केली आहे मात्र यातून पाणीही पलीकडे जात नाही,सध्या येथे पाणी व त्यावर कच-याचा थर साचला आहे,यातून मोठी दुर्गंधी पसरली आहे यातून रोगराई पसरू शकते. या पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे तर मोरी ही तोंडाला रस्त्यालगत खुली असून यामध्ये मोठा अपघात होऊ शकतो असे माजी उपसरपंच सचिन कामथे, सुनील कामथे व ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.
तर याबाबत तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना पत्र व्यवहार केला आहे मात्र अध्यापपर्यंत याची कोणतीही दुरुस्ती झाली नाही.
पालखीपूर्वी ही दुरुस्ती होणे गरजेचे आहे. यासाठी येथील नागरिक प्रशासकीय अधिकारी यांच्या दौऱ्यांच्यावेळी त्यांची वाट पाहत असतात. किमान या दौऱ्यातूनतरी ही परिस्थिती पाहिल्यावरती हा विषय मार्गी लागेल अशी अपेक्षा या नागरिकांना आहे मात्र विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे दौरे झाले परंतु हे दोन्ही अधिकारी मात्र या ठिकाणी थांबलेच नाहीत गाड्यांचा ताफा सुसाट पुलावरून गेला,त्यामुळे ग्रामस्थांची मोठी नाराजी झाली असून आता ही दुरुस्ती पालखी पूर्वी कशी होणार असा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे.