त्या शिक्षकाची त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी , गटविकास अधिकाऱ्यांची शाळेला भेट
त्या शिक्षकाची त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी , गटविकास अधिकाऱ्यांची शाळेला भेट
जेजुरी, दि. २३ पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील मठवाडी जिल्हापरिषदेतील त्या शिक्षकांबद्दल पुरंदरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी त्रि सदस्यीय समिती नेमून चौकशी केली. त्याचबरोबर स्वतः गटविकास अधिकारी अमिता पवार यांनी गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांच्यासह शाळेला भेट देऊन विध्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचे आवाहन केले.
मठवाडी शाळेतील उपशिक्षक रियाज तांबोळी यांच्याबद्दल गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे अनेकदा गंभीर तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने शेवटी ग्रामस्थ व पालकांनी काल शुक्रवारी ( दि. २२ ) मुलांना शाळेत न पाठवता शाळाच बंद केली. आणि थेट पंचायत समिती कार्यालय गाठले. गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात पालकांनी निर्णय होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी पुरंदर चे आ. संजय जगताप यांनी पालक आणि प्रशासन यांच्या त मेळ घालण्याचा प्रयत्न केला. पालकांनी केलेल्या तक्रारीबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई करावी असे आदेश ही दिले. जो पर्यंत सदर शिक्षकावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मुले शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला होता. यावर आ.जगताप यांनी सोमवार पर्यंत योग्य तो निर्णय घेण्याचा सूचना देऊन ग्रामस्थांना शांत केले होते.
दरम्यान, आज सकाळी ११ वाजता पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. पवार आणि गटशिक्षणाधिकारी श्री गवळी यांनी थेट शाळेला भेट देऊन पालकांशी चर्चा केली. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांना मुले शाळेत पाठवण्याचे आवाहन ही केले
मात्र पालकांनी आधी कारवाई मगच मुले शाळेत पाठवू असे स्पष्ट सांगितले. यानंतर मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी गटसमन्वयक सुरेश मोरे, केंद्रप्रमुख सतीश कुदळे, धनाजी नाझीरकर यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करून आजचे आज अहवाल सादर करण्याची सूचना दिली.
या समितीसमोर ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी पुन्हा रियाज तांबोळी यांच्याबाबत गंभीर आरोप लेखी स्वरूपात केले आहेत.
विध्यार्थ्यांना एकत्र खेळू व जेवण करू न देणे, आजारी विद्यार्थ्यांना तीन तीन तास लघु शंकेला जाऊ न देणे, स्व:ताची गाडी धुवायला व पुसायला लावणे, सदर शिक्षक व्यसनी असून मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत असून हा शिक्षक आम्हाला नको अशा ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याचे समजते.
याबाबत चौकशी समितीचे सदस्य गट समन्वयक सुरेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी श्री तांबोळी यांच्याबाबत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबतचा अवहाल आम्ही वरिष्ठांकडे आजच सुपूर्त केल्याचे सांगितले.
येत्या सोमवारपर्यंत याबाबतच निर्णय घेतला जाणार असल्याचे पुरंदरच्या गटविकास अधिकारी अमिता पवार यांनी ही आयबीएन शी बोलताना सांगितले.