जेजुरीच्या जयाद्री डोंगर खोऱ्यातील वन्य जीवांची तहान भागणार जयमल्हार प्रतिष्ठानचा सलग बाराव्या वर्षी उपक्रम आणखी नवीन चार पाणवठे बांधणार
विशाल बारभाई
जेजुरी, दि. १०
जेजुरी परिसरातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील वन्यजीवासाठी जयमल्हार प्रतिष्ठानच्या वतीने वन विभागातील कडेपठार पायथ्याशी असणाऱ्या पाणवठ्यात टँकर द्वारे पाणी सोडून वन्य जीवांची तहान भागविण्यासाठी सलग बाराव्या वर्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिर व कडेपठार मंदिर परिसरात सह्याद्रीच्या उपरांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयाद्री डोंगरांचा समावेश आहे.
या जयाद्रीच्या डोंगर खोऱ्यात बिबटे,कोल्हे, तरस, हरिने, ससे तसेच मोठ्या संख्येने मोर, गरुड, घार आदी वन्य पशू पक्ष्यांचे वास्तव्य आहे.
पुरंदर तालुक्याचा परिसर तसा नेहमीच दुष्काळी भाग समजला जातो. हिवाळ्यात झरे आटल्या नंतर उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. पाण्या अभावी वन्य जीवांचे हाल सुरू होतात.पाण्यासाठी वन्यप्राणी गावात येतात अशावेळी या प्राण्यावर कुत्री हल्ला करीत असतात.
या वन्यजीवासाठी वन विभागाच्या वतीने या परिसरात आठ पाणवठे तयार करण्यात आले असून यात टँकर द्वारे पाणी सोडून उन्हाळ्यात या वन्य प्राण्यांची तहान भागवली जाते.
जेजुरी येथील जयमल्हार प्रतिष्ठानच्या वतीने सलग बारा वर्षे उन्हाळ्याच्या सुरुवातीला या पाणवठे मध्ये पाणी सोडून व पक्षांना धान्य ठेवून वन्यजीव वाचविले जातात.
अनेक नागरिक या वन्य जीवांसाठी पाण्याचे टँकर देवून आपला व वाढदिवस साजरा करत असतात.
शिवजयंतीचे औचित्य साधून या पांनवठ्यात जेजुरी देवसंस्थान प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांच्या हस्ते टँकरद्वारे पाणी सोडून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावर्षीचा पहिला टँकर सचिन कुंभार व तुषार कुंभार यांच्या वतीने देण्यात आला.
या परिसरात असणारे पाणवठे कमी पडत असून वन्य जीवांसाठी आणखी चार पाणवठे लोकसहभागातून लवकरच बांधण्यात येणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते सचिन कुंभार,कुमार गावडे,रमेश बयास तसेच जयमल्हार पतसंस्थेचे बाळासाहेब दरेकर प्रत्येकी एक पाणवठा बांधून देणार असल्याचे जयमल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक विशाल बारभाई यांनी सांगितले.
जयमल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक विशाल बारभाई, जेजुरी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, जेजुरी शहर भाजपाचे अध्यक्ष सचिन पेशवे , माजी नगरसेवक रमेश बयास,नगरसेवक रोहित खोमणे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दरेकर, धनंजय केळकर, वन विभागाचे वनरक्षक धनंजय देवकर, वनसेवक गजानन बयास कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पावसाळा सुरू होई पर्यंत डोंगर खोऱ्यातील सर्व पाणवठ्यात वन्य जीवांसाठी टँकरद्वारे पाणी सोडण्यात येणार असून नागरिकांनी वाढदिवस, लग्न, तसेच शुभकार्य प्रसंगी पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत असे आवाहन यावेळी विशाल बारभाई यांनी केले.




