शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांना न्यायालयाचा दिलासा.
सर्व याचिका निकाली काढल्यामुळे बदल्यांचा मार्ग मोकळा.
(प्रतिनिधी )
पुरंदर, दि. ११
ग्रामविकास विभागामार्फत दि. १८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया (२०२४-२५) पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सुरु झाली होती. त्याबाबत (७ नोव्हेंबर २०२४) वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले होते.
मात्र,आंतरजिल्हा आपसी बदल्या झालेल्या शिक्षकांपैकी सेवा कनिष्ठ शिक्षकांची सेवा ही बदलीसाठी ग्राह्य धरावी याकरिता काही शिक्षक न्यायालयात गेले होते.
आपसी जिल्हा सेवा ज्येष्ठते संदर्भात निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने बदली प्रक्रियेला ५ मे पर्यंत स्थगित दिली होती.५ मे रोजी न्यायालयात यावर सुनावणी होऊन ९ मे रोजी न्यायालयाने अंतिम निकाल दिला.
या निर्णयानुसार आंतरजिल्हा बदली मधील आपसी बदलीद्वारे बदली झालेल्या शिक्षकांपैकी सेवा कनिष्ठ शिक्षकांची सेवा दोन्ही शिक्षकांना बदलीसाठी ग्राह्य धरावी,असा निकाल दिला आहे.आपसी आंतरजिल्हा बदलीमध्ये ज्या शिक्षकांना सोयीनुसार शाळा मिळाली त्या शिक्षकांना बदली नको होती.तर ज्यांना आपसी बदलीने गैरसोयीची शाळा मिळाली त्यांना मात्र बदली हवी होती.न्यायालयालयाने दिलेल्या आजच्या निकालाव्दारे बदली हवी शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्ह्यातील (२०२२-२३)मध्ये अवघड क्षेत्रात बदली झालेल्या ६ व्या टप्प्यातील अन्यायग्रस्त २४१ शिक्षक मार्च २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात गेल्यामुळे न्यायालयाचा स्थगिती आदेश होता.मात्र उच्च न्यायालयाने बदली प्रक्रिये संदर्भात न्यायालयात दाखल असलेल्या सर्वच याचिका निकाली काढल्यामुळे यावर्षीच्या शिक्षक ऑनलाईन बदल्या लवकरच सुरु होतील असे शिक्षक समितीचे राज्यनेते महादेवराव माळवदकर,जिल्हा सरचिटणीस संदीप जगताप, कोषाध्यक्ष सुनील लोणकर,शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष धनंजय जगताप,पदवीधर सभेचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव कामथे यांनी सांगितले.