खानवडीतील ‘ज्योती सावित्री’ जि.प. शाळेची प्रवेश प्रक्रिया वादात गोरगरिबांच्या मुलांना डावलल्याचा पालकांचा आरोप; फेरप्रवेश प्रक्रियेची मागणी
खानवडीतील ‘ज्योती सावित्री’ जि.प. शाळेची प्रवेश प्रक्रिया वादात
गोरगरिबांच्या मुलांना डावलल्याचा पालकांचा आरोप; फेरप्रवेश प्रक्रियेची मागणी
प्रतिनिधी
पुरंदर दि. १७पुरंदर तालुक्यातील खानवडी (ता. पुरंदर) येथील ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेश प्रक्रियेवरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सुरू झालेल्या या उपक्रमाबद्दल सुरुवातीला पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते; मात्र प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेनंतर अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या शाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व असंख्य मंत्री,आमदार, खासदार ,शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाल्यामुळे ही शाळा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
या शाळेत बारावीपर्यंत मोफत व इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणार असल्याने ग्रामीण भागातील गोरगरिब कुटुंबांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. परंतु, निवड प्रक्रियेदरम्यान अनेक फेऱ्या पार करून अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अचानक प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेतले, त्यांना मोठ्या प्रमाणावर डावलण्यात आले असून, काही इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. “गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमात ‘गरीबी’ची व्याख्या नेमकी काय ठरवली?” असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
यासोबतच, प्रवेश प्रक्रियेतील निकष, निवड यादी आणि अपात्र ठरवलेल्या विद्यार्थ्यांची कारणे जाहीर करण्याची मागणीही जोर धरत आहे. पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत पालकांनी प्रशासनाकडे सविस्तर माहिती देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पुरंदर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी गोविंद लाखे यांनी या प्रकरणाची माहिती घेत असून, “जर खरोखरच गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असेल, तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे,” अशी भूमिका व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, शाळा व्यवस्थापनाने प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेल्या समितीने सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याचा दावा केला आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, लवकरच शाळेसमोर उपोषण किंवा आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची चौकशी करावी आणि गरज पडल्यास फेरप्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी ठाम मागणी अंकिता कामथे आणि विशाल कामथे व इतर पालकांकडून करण्यात येत आहे.
