विनापरवानगी शिक्षण परिषद ! शिक्षक नाकबुल ; फोटो मात्र सोशल मिडीयावर व्हायरल !!
प्रतिनिधी
जेजुरी, दि.२६ पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांबळी येथे शनिवार दि.८ मार्च २०२५ रोजी सुट्टीच्या वेळेत प्रभारी केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांनी पदाचा गैरवापर करत येथील उपशिक्षक मोहन जगताप यांची पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्यामुळे शिक्षण परिषद असल्याचा बनाव करत केंद्रशाळेचा त्यांच्या सत्कार व जेवणावळी देण्यासाठी वापर केला.
सदर कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.म्हणून पुरंदर तालुक्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी पंकज शेळके,गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल, तत्कालीन शिक्षण अधिक्षक अनिल मोरे यांचेकडे चौकशी केली असता केंद्र प्रमुखांनी याबाबत कसलीही कल्पना दिली नव्हती.किंवा या कार्यालयाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले होते.
याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेतील शिक्षण विस्तार अधिकारी निलीमा म्हेत्रे व गोरक्षनाथ हिंगणे यांना सदर घटनेची निःपक्षपाती चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
चौकशी मध्ये केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांच्यावर प्रशासकीय कारवाई होवू नये,म्हणून चांबळी केंद्रातील सर्वच शिक्षकांना मेमाणे यांनी एकसारखेच मुद्दे देवून एकसारखेच जबाब चौकशी अधिकाऱ्यांनी नोंदवून घेत १२३ पानांचा चौकशी अहवाल शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांना सादर केला.
शिक्षण परिषदेचे आयोजन करणाऱ्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था(डाएट) पुणे यांनी किंवा शिक्षण विभाग यांनी मेमाणे यांना शिक्षण परिषद घेण्याबाबत कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश दिले नसल्याचा उल्लेख अहवालात आहे.त्यानुसार प्रभारी केंद्र प्रमुख प्रताप मेमाणे यांना दोषी ठरवून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होणे अपेक्षित होते.मात्र सदर कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते त्या फोटोमधील फलकावर ‘शिक्षण परिषद’ असा स्पष्ट उल्लेख आहे.मात्र उपस्थित सर्वच शिक्षकांनी दिलेल्या लेखी जबाबात शिक्षण परिषद नसून मोहन जगताप यांची संचालक पदी निवड झाली म्हणून सत्कार व जेवण केल्याचा उल्लेख आहे.
त्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांनी प्रभारी केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांना अभय देण्यासाठी केलेला प्रयत्न उघड झाला आहे.मात्र,शिक्षणाधिकारी संजय नाईकडे हे प्रताप मेमाणे यांच्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.




