शैक्षणिक नुकसान टाळून सुट्टीच्या दिवशी सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करावे.
शैक्षणिक नुकसान टाळून सुट्टीच्या दिवशी सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करावे.
पुरंदर, दि. १६ ( बी. एम. काळे ) येथील म.ए.सो. वाघिरे हायस्कूल येथे नुकत्याच तालुकास्तरीय प्राथमिक शिक्षकांच्या विविध स्पर्धा संपन्न झाल्या. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षक सक्षमीकरण अंतर्गत या स्पर्धा घेण्यात आल्या.
सदर स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी घोषित करुन
यशस्वी स्पर्धकांना त्या ठिकाणी ट्रॉफी व प्रमाणपत्र देणे अपेक्षित असताना देखील गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी निकाल घोषित केले नाहीत.
तसेच निकालामध्ये देखील फेरफार झाल्याचे पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीने कळवले आहे.
सदर ठिकाणी स्पर्धा होत असताना त्यामध्ये एका विषय तज्ञाचा व संघटनेच्या पदाधिकाऱ्याने हस्तक्षेप करत स्वतःच्या शिक्षक पत्नीचा प्रथम
क्रमांक येण्यासाठी स्पर्धेत परीक्षक असणाऱ्या माध्यमिक शिक्षकांशी संगनमत व लुडबुड करत तसेच इतर विविध मार्गाने हस्तक्षेप केल्याचा आरोप स्पर्धेतील सहभागी
स्पर्धकांनी केला आहे.
तसेच या 16 स्पर्धेतील विजेत्या 48 शिक्षक स्पर्धकांना मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी शालेय वेळेत भिवडी येथे
बक्षीस वितरणासाठी गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी बोलावले आहे.
मात्र या स्पर्धा रविवारी झाल्या त्याच पद्धतीने रविवारीच स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणे गरजेचे आहे मात्र असे न झाल्यामुळे
16 स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाचे 48 शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे सदर शिक्षकांना शालेय वेळेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून, अध्यापनाचे तास बुडवून पारितोषिक वितरणाला बोलवल्याचे समोर आले आहे.
याबाबत पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनीलतात्या कुंजीर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ही स्पर्धा शालेय सुट्टीच्या दिवशी घेतली त्याच पद्धतीने शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या हेतूने सदरचे बक्षीस वितरण सुट्टीच्या दिवशी सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी संजय जाधव घेतील अशी अपेक्षा आहे.
या संदर्भात गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेशी संबंधित नाहीत. शिक्षक सक्षमीकरण या स्पर्धा जिल्हा परिषदेने राबवलेला उपक्रम आहे.या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे या स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्या करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश आहेत.