आरोग्यधार्मिकपुणेसामाजिक

उवसग्गहरं स्तोत्राच्या दशकपूर्ती सोहळ्यात ८ हजार भाविकांची उपस्थिती

सामुदायिक जापाने बिबवेवाडी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला; अध्यात्मासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश

प्रतिनिधी

पुणे, दि. १८ जैन धर्मपरंपरेत परमपावन आणि संकट निवारणासाठी श्रद्धेने जपले जाणारे ‘श्री उवसग्गहरं स्तोत्र’च्या सामुदायिक जापाच्या उपक्रमाने यंदा दशकपूर्तीचा टप्पा गाठला. त्यानिमित्त रविवार, ६ सप्टेंबर रोजी बिबवेवाडी येथील जैन स्थानकाच्या प्रांगणात भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास सुमारे ८ हजार भाविकांनी उपस्थित राहून एकसुरात ‘श्री उवसग्गहरं स्तोत्रा’चा जाप केला. सामुदायिक जापाच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

दुपारी चार वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने जैन समाजबांधव तसेच भाविक सहभागी झाले होते. भव्य मंडपात भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित राहून सामुदायिक जापात सहभाग घेतला. एकाच सुरात हजारो भाविकांकडून स्तोत्राचा जाप होत असताना निर्माण झालेले आध्यात्मिक वातावरण उपस्थितांसाठी अत्यंत भावस्पर्शी ठरले.

या मंगल सोहळ्यास दिगंबर आचार्य पू. श्री प्रणामसागरजी म. सा., वाणीचे जादूगार पू. श्री रमणिकमुनिजी म. सा., वीरायतनच्या शिल्पकार आचार्य पू. श्री चंदनाजी म. सा. यांच्या सुशिष्या पू. श्री विभाजी म. सा. व पू. श्री संघमित्राजी म. सा., तसेच बिबवेवाडी येथील आर. एम. डी. स्थानकात चातुर्मास सुरू असलेल्या साध्वी पू. श्री जयश्रीजी म. सा. आदिठाणा यांच्यासह साधू-साध्वीगणांची उपस्थिती व आशीर्वचन लाभले.

दहा वर्षांची अखंड परंपरा

आर. एम. डी. धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन आणि उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांपासून ‘उवसग्गहरं स्तोत्र’ सामुदायिक जापाचा उपक्रम आयोजित केला जात आहे. यंदाच्या दशकपूर्ती सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

स्वागतपर मनोगतात शोभाताई रसिकलाल धारीवाल यांनी या उपक्रमामागील वैयक्तिक अनुभव सांगितला. जैन धर्मातील हजारो वर्षांच्या संस्कार आणि अध्यात्मिक परंपरेत विविध मंत्रांना विशेष स्थान आहे. त्यापैकी ‘उवसग्गहरं स्तोत्र’ हे संकट निवारणासाठी श्रद्धेने जपले जाते. या स्तोत्राच्या जापाचा स्वतःला सकारात्मक अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.

रसिकलालजी धारीवाल रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना ‘उवसग्गहरं स्तोत्र’च्या जापातून मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांचे प्राण वाचल्याचा आपला ठाम विश्वास असल्याचे शोभाताई धारीवाल यांनी सांगितले. या अनुभवातून निर्माण झालेल्या श्रद्धेतून गेल्या दहा वर्षांपासून हा सामुदायिक जापाचा उपक्रम अखंड सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यात्मासोबत पर्यावरण संवर्धन

दशकपूर्ती सोहळ्यात केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांनाच महत्त्व न देता सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचीही जोड देण्यात आली. सोहळ्याच्या ठिकाणी खास पुस्तक स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलवरून भाविकांना विविध आध्यात्मिक व धार्मिक विषयांवरील पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.

तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सुमारे २०० भारतीय प्रजातींच्या रोपांचे निःशुल्क वाटप करण्यात आले. अध्यात्म, संस्कार, ज्ञानप्रसार आणि निसर्गसंवर्धन यांची सांगड घालणारा हा उपक्रम उपस्थित भाविकांच्या विशेष पसंतीस उतरला.

हजारो भाविकांच्या सहभागाने सोहळ्याला भव्यता

दशकपूर्तीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या सामुदायिक जापात पुणे शहरासह विविध भागांतून भाविक सहभागी झाले होते. हजारो भाविकांनी एकत्रितपणे स्तोत्राचा जाप केल्याने बिबवेवाडी जैन स्थानकाचा परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला. साधू-साध्वीगणांचे मार्गदर्शन, सामुदायिक जाप, आध्यात्मिक साहित्याचे वाटप आणि वृक्षारोपणासाठी रोपांचे वितरण यामुळे या सोहळ्याला धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकीचीही जोड मिळाली.

दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाने दशकभर सातत्य राखत हजारो भाविकांना एकत्र आणले. श्रद्धा, सामूहिक प्रार्थना, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा हा दशकपूर्ती सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page