रामभरोसे जेजुरी बस स्थानक, प्रवासी सुविधापासून वंचित
(बी.एम काळे )
जेजुरी, दि. ४ महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या खंडोबाच्या जेजुरी शहराचे बस स्थानक नूतनीकरण सुरु आहे. मात्र अस्तित्वात असणाऱ्या तात्पुरत्या बस स्थानकात प्रवाशांच्या सुविधाचा प्रचंड अभाव आहे. शिवाय केवळ एकच सुरक्षारक्षक असल्याने सुरक्षा व्यवस्था रामभरोसेच असल्याचे निदर्शनास येते आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने जेजुरीला दररोज हजारो भाविक देव दर्शनासाठी येते असतात. वर्षाकाठी आठ यात्रा, आणि प्रत्येक रविवारी येथे भाविकांची मोठीं गर्दी राहते. पन्नास लाखाहून अधिक भाविक वर्षाकाठी जेजुरीला भेट देत असतात. याशिवाय जेजुरी शहराच्या लगतच औद्योगिक वसाहत असल्याने दररोजच्या प्रवाश्यांची संख्या ही मोठी आहे. यामुळे पूर्वीचे ४० वर्षांपूर्वी सुधारित बस स्थानकाची दुरावस्था झाल्याने येथील बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी ३१मार्च २०१९ रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. कोरोना काळामुळे हे काम रखडले होते. मात्र आता हे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरु आहे. यासाठी शासनाकडून सुमारे सहा कोटी ३८ लाख ६४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन अध्ययावत इमारत बांधन्यात येणार आहे. मात्र दररोज साधारणपणे पुणे, मुंबई, पंढरपूर, फलटण, सांगोला, आटपाडी, मंगळवेढा, बारामती आदी भागातून दोनशे पेक्षा जास्त बस गाड्यांची जा ये या स्थानकातून होत आहे. यासाठी शासनाने तीन शेड चे तात्पुरते बस स्थानक निर्माण केलेले आहे. यापैकी एका शेड मध्ये वाहतूक नियंत्रकासाठी केबीन करण्यात आलेले आहे. प्रत्येक शेड मध्ये साधारण १५ प्रवाशी बसू शकतात अशीच बैठकव्यवस्था असल्याने प्रवाशांना कडक उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्रवाशांना येथे स्थानकात केवळ वरवरचे सपाटीकरण केलेले असल्याने प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे. उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याची सुविधा नाहीच. याशिवाय स्वच्छता गृह केवळ पत्रे ठोकून केलेले असल्याने तेथे कायम दुर्गंधी आणि अस्वच्छता आहे. प्रवाशांना स्वच्छता गृहात जाता ही यात नाही अशी गंभीर स्थिती या स्वच्छतागृहांची आहे. यात भर की काय मोकात जनावरे, डुकरांचा मोठा सुळसुळात असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी पाच वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत एस टी बसेसची येजा सुरु होते. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाड्या बस स्थानकात जात ही नाहीत. संपूर्ण बस स्थानकाची सुरक्षा व्यवस्था केवळ एकाच सुरक्षारक्षकांवर अवलंबून आहे. बस स्थानकासाठी सकाळी ६ते दुपारी २आणिदुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत दोनच वाहतूक नियंत्रकांची नेमणूक केलेली असल्याने रात्री दहानंतर एकमेव सुरक्षा रक्षकांवर संपूर्ण बस स्थानक अवलंबून आहे. येथे बारामती सासवड डेपोतून येणाऱ्या काही गाड्या मुक्कामी असतात. याच बरोबर रात्रीच्या वेळी खासगी वाहने ही बस्थानकातच उभी असतात. रात्रीच्या वेळी कोणताही प्रवाशी बस स्थानकात जाऊच शकत नाही अशी परिस्थिती आहे.
जेजुरी बस स्थानकाच्या असुविधाबाबत सासवड बस आगार व्यवस्थापक सागर गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नव्याने उभारण्यात येणाऱ्या बस स्थानकाचे काम जलदगतीने सुरु आहे. काही महिन्यात हे काम पूर्ण होईल. प्रवाशासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ज्या काही असुविधा आहेत यांकडे तातडीने लक्ष घालण्यात येईल अशीच साळसूद प्रतिक्रिया दिली आहे.
स्वारगेट बस स्थानकातील घटनेमुळे महिला प्रवाशात जेजुरी बस स्थानकबाबत अत्यंत असुरक्षिततेची भावना आहे. यातच सासवड, पुणे येथे नोकरी व शिक्षणासाठी जाणाऱ्या सुमारे सातशे नोकरदार, विद्यार्थी, विद्यार्थिनी पासधारकांना हे बस स्थानक असुरक्षित वाटत आहे. यामुळे पालक वर्गातून ही नाराजी व्यक्त करण्यात येते आहे.
येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे उडणारी धूळ, दुरावस्था झालेले स्वच्छतागृह, आदी असुविधा बाबत राज्य परिवहन मंडळाकडून त्वरित उपाय योजना कराव्यात अशी मागाणी प्रवाशंकडून होत आहे.