पुणेशिक्षण

केंद्रप्रमुखांनीच आदर्श पाठ घेऊन व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करावेत. शिक्षकांकडूनच प्रशासकीय कामे नकोतच

प्रतिनिधी

पुरंदर , दि. १० जिल्हा परिषद पुणे अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील शाळांमध्ये आठवड्याला किमान पाच आदर्श व मार्गदर्शक पाठ घेऊन त्यांचे व्हिडिओ तयार करून ते विनोबा अ‍ॅप तसेच युट्यूब चॅनेलवर अपलोड करावेत.अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेने केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मागणीमुळे केंद्रप्रमुखांच्या कामकाजाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना प्रभावी अध्यापनासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळावे.यासाठी केंद्रप्रमुख तसेच गट साधन केंद्रातील विषयतज्ज्ञ शिक्षकांनी शाळांवर जाऊन आदर्श व मार्गदर्शक पाठांचे प्रात्यक्षिक दाखवणे आवश्यक आहे.अशा पाठांचे व्हिडिओ विनोबा अ‍ॅप व युट्यूबवर उपलब्ध केल्यास जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना त्याचा अभ्यास करता येईल आणि अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. दरम्यान,अनेक केंद्रांमध्ये माहिती संकलन,अहवाल देणे, शाळांची वार्षिक तपासणी यांसारखी कामे केंद्रप्रमुखांनी स्वतः करण्याऐवजी पदवीधर शिक्षक किंवा उपशिक्षकांकडून करुन घेतली जात असल्याचे चित्र आहे.त्यामुळे संबंधित शिक्षकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. केंद्रप्रमुखांनी स्वतःची जबाबदारी स्वतः पार पाडावी आणि शिक्षकांना केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी केंद्रप्रमुख,विषयतज्ज्ञ शिक्षक व विस्तार अधिकारी शाळा भेटींसाठी शिक्षकांच्या वाहनांचा वापर करत असल्याच्या तक्रारी आहेत.काही ठिकाणी शिक्षकांना चालक म्हणूनही सोबत जावे लागत आहे. केंद्रप्रमुख व विषयतज्ज्ञ शिक्षकांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना ऑनलाईन माहिती भरण्याबाबत योग्य प्रशिक्षण द्यावे.केवळ माहिती भरण्यासाठी वारंवार तगादा लावण्यापेक्षा ती माहिती कशी भरावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तसेच तालुका स्तरावर विषय शिक्षकांना नेमून दिलेली कामे इतर शिक्षकांकडून करून घेण्याची पद्धतही थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी व शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा.अशी मागणी शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे केल्याची माहिती कास्ट्राईब शिक्षक महा संघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे व महासचिव विठ्ठल सावंत यांनी दिली.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष?

विशेष म्हणजे,पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी यापूर्वी शिक्षकांकडून इतर प्रशासकीय कामे करून घेऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना देणारे पत्र काढले होते. मात्र अनेक ठिकाणी त्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव चित्र समोर येत असून संबंधित पत्रालाच प्रत्यक्षात ‘केराची टोपली’ दाखवण्यात आल्याची चर्चा शैक्षणिक क्षेत्रात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page