धक्कादायक…. मोबाईल दिला नाही म्हणून शाळकरी मुलाची आत्महत्या…
बारामती : दि.३० ( प्रतिनिधी ) आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून १४ वर्षाच्या मुलाने नैराश्यातुन पत्र्याच्या शेडच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातून समोर आली आहे. शुल्लक कारणावरून इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलाने एवढे मोठे पाऊल उचलल्याने बारामती तालुक्याला हादरून सोडणारी ही घटना घडली आहे.
गुरुवार (दि.२९ ) रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडे सात वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.
शुभम मोतीराम धोत्रे (वय १४) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम मोतीराम धोत्रे (वय १४) हा सोमेश्वर विद्यालय अंजनगाव येथे इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत होता. याबाबत राजेंद्र अशोक लष्कर (वय २७) , रा. क-हावागज, लष्करवस्ती (ता. बारामती, जि. पुणे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
यावेळी शुभमने आपल्या आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट धरला होता.मात्र, घरची परिस्थिती हलाकीची असल्याने आई मोबाईल घेवु शकली नाही, म्हणून अवघ्या चौदा वर्षाच्या शुभमने नैराश्यातुन घराच्या बाजुला असलेल्या पत्र्याच्या शेडच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.