जेजुरी बस स्थानक होणार अद्ययावत, सुमारे साडे सहा कोटींची निविदा….आ.संजय जगताप
जेजुरी, दि.१९ महाराष्ट्राचे कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीच्या बसस्थानकासाठी सुमारे ६ कोटी ३८ लक्ष ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच बस स्थानकाचे काम सुरू होणार असून पुढील दीड वर्षात बसस्थानकाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आ.संजय जगताप यांनी दिली.
महाराष्ट्राचे लोकदैवत असल्याने तीर्थक्षेत्र जेजुरीत राज्यभरारून दररोज हजारो भाविक देव दर्शनासाठी येत असतात. याशिवाय पुणे, मुंबई, बारामती, फलटण सातारा पंढरपूर आदी भागातील प्रवाशांना हे बस स्थानक गरजेचे आहे. जेजुरी लगत औद्योगिक वसाहत असल्याने कामगार वर्ग ही येथे मोठ्या प्रमाणावर असल्याने बस स्थानक अत्यंत महत्वाचे ठरलेले आहे,
मात्र गेल्या ४० वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या येथील बस स्थानकाची दुरुस्ती व सोयी सुविधा अभावी स्थानकाची दुर्दशा झालेली होती. भाविकांकडून तसेच स्थानिक नागरिकांकडून जेजुरी बस स्थानकाच्या दुरुस्तीचे काम, व प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी वारंवार होत होती.
या संदर्भात आ. संजय जगताप आणि खा.सुप्रिया सुळे यांनी शासनदरबारी प्रयत्न केले होते. बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ३१ मार्च २०१९ च्या अर्थसंकल्पात निधी ची तरतूद ही उपलब्ध झाली होती. केवळ निविदा आणि काम सुरू बाकी होते. मात्र कोविड मुळे पुढील प्रक्रिया थांबलेली होती.
आ.जगताप यांनी याबाबत पुन्हा शासन दरबारी या कामासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला यश आले असून लवकरच जेजुरी बस स्थानकाच्या कामाला पुढील महिण्यात सुरुवात होणार असून बस स्थानकाची संपूर्ण पुनर्बांधणी आणि प्रवाशांना अद्ययावत सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
जेजुरी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीला सुरुवात होणार असल्याने जेजुरीकर नागरिक, प्रवाश्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.