पुरंदरशिक्षणसहकार

पराभवानंतर वाद चिघळला; चेअरमन जितेंद्र कुंजीर यांच्या हकालपट्टीवरून खळबळ! बेकायदेशीर कारवाईचा आरोप; संघटनांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह !!

प्रतिनिधी

जेजुरी, दि. २९
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीनंतरचा वाद आता अधिकच चिघळत चालल्याचे चित्र आहे. निवडणुकीतील पराभव सहन न झाल्याने व नैराश्यातून विविध संघटनांतून आपली हकालपट्टी करण्यात आल्याचा आरोप चेअरमन जितेंद्र कुंजीर यांनी केला आहे.
कुंजीर यांच्या मते, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा केंद्रप्रमुख संघ आणि महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ या संघटनांकडून करण्यात आलेली कारवाई नियमानुसार नसून वैयक्तिक द्वेषातून करण्यात आली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना कुंजीर म्हणाले,
“माझी हकालपट्टी ही स्वतःला तथाकथित व स्वयंघोषित नेता समजणाऱ्या राजेंद्र जगताप यांच्या अहंकाराला चेअरमन निवडणुकीत बसलेल्या धक्क्यामुळे करण्यात आली आहे. मी सर्वसामान्य व प्रामाणिक शिक्षकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने काम करत असल्याने त्यांचे पितळ उघडे पडले आहे.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की,
“पुरंदर तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस भानुदास कुंभारकर आणि पुणे जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष चिंतामण अद्वैत यांना राजेंद्र जगताप यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून, मनमानी पद्धतीने, केवळ तोंडी सूचना व व्हॉट्सअ‍ॅप पोस्टद्वारे माझी बेकायदेशीर हकालपट्टी करण्यास सांगितले. याबाबत अधिकृत ठराव (प्रोसिडिंग) असल्यास तो संबंधितांनी सादर करावा.”
कुंजीर यांनी आणखी गंभीर आरोप करताना म्हटले की,
“केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष चिंतामण अद्वैत हे स्वतःच्या निवडीचा अधिकृत ठरावही सादर करू शकत नाहीत.”

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाबाबत शिक्षकांमध्ये काही प्रश्न उपस्थित होत आहेत. गेली १० ते १५ वर्षे बाळासाहेब मारणे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. एवढ्या दीर्घकाळ एकाच पदावर ते कसे राहिले, याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच,राज्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही पुणे जिल्हा संघटनेतील अध्यक्षपद अद्याप रिक्त का आहे,हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यासोबतच, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आणि केंद्रप्रमुख संघटना या काही व्यक्तींमार्फत अनेक वर्षे मनमानी पद्धतीने चालवल्या जात असल्याचीही शिक्षकांमध्ये चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page