आता धुरळा उडणार…जेजुरीत सर्वसाधारण प्रवर्ग… इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी
प्रतिनिधी
जेजुरी, दि. ६ जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने जेजुरीतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. दुपारीच आरक्षण जाहीर झाल्यानंतर गेले तीन वर्षांपासून तयारी करणाऱ्यांनी लगेच फोनफोनी सुरु ही केली आहे. इच्छुकांनी आपापल्या समर्थकांना पक्ष श्रेष्टीकडे आपल्या नावाचा आग्रह धरण्यासाठी जोरदार प्रयत्न करावेत असे सांगावे धाडायला सुरुवात केली आहे.
गेल्या पंचवार्षिक (सन २०१७) च्या निवडणुकीत नगराध्यक्षपद इतर मागासवर्ग महिलेसाठी राखीव होते. यावेळी हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटेल अशी अपेक्षा धरून अनेकांनी लोक संपर्क वाढवण्यावर भर दिला होता. त्यांना आता मोठीं संधी निर्माण झाली आहे.
मागच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशी लढत झाली होती. काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातच खरी लढत झाली होती.
आजची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या तीन वर्षात बरेच पुलाखालून पाणी वाहून गेलेले आहे.
आजची वस्तुस्थिती पाहता या निवडनुकीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धब ठाकरे गट दिसणार नाहीत. किंवा त्यांची तशी अजूनतरी कसलीच तयारी ही दिसत नाही. मात्र भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (श. प. गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प गट ) शिवसेना शिंदे गट, आणि मनसे यांचे नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार असणार आहेत. याशिवाय सर्वसाधारण प्रवर्ग असल्याने अपक्षांची संख्या ही दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय निवडणुकीत सत्तेत असणारे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे गट शिवसेना यांचे मनोमिलन होणार का? असा संभ्रम नागरिकांत आहेच.




