शिक्षण उपसंचालक डॉ. सुचिता पाटेकर यांच्या ‘नावीन्यातून नैपुण्य’ पुस्तकाला पुरस्कार
प्रतिनिधी
पुणे, दि. ९ प्राथमिक शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. सुचिता पाटेकर यांच्या ‘नावीन्यातून नैपुण्य’ या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार नुकताच मुंबईत प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी शिक्षणाधिकारी म्हणून केलेले अभिनव प्रयोग या पुस्तकात समाविष्ट असून शिक्षकांच्या प्रयोगशिलतेला संधी देणाऱ्या शिक्षणाधिकारी म्हणून पाटेकर राज्यभरात ओळखल्या जातात.
शिक्षण विकास मंच या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विषयक विभागाद्वारे राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे करण्यात आले होते. या परिषदेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालक डॉ सुचिता पाटेकर यांना प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व एम के सी एलचे विवेक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे डॉ. सुचिता पाटेकर यांच्या शैक्षणिक लेखनाची आणि संशोधनात्मक कार्याची दखल घेतली गेली असून, शिक्षण क्षेत्रात नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मान्यता मिळाली आहे. यावेळी यावेळी शिक्षण विकास मंचचे डॉ वसंत काळबांडे, बसंती रॉय, धनवंती हार्डीकर उपस्थित होते.
डॉ. पाटेकर यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ‘नावीन्यातून नैपुण्य’ हे पुस्तक शिक्षक, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




