शिवरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न. अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून सर्वसामान्यांची कामे करावीत – आ. शिवतारे
प्रतिनिधी
शिवरी, दि. १८
शिवरी (ता.पुरंदर) येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले.यावेळी शिवरी व वाल्हे मंडलातील जवळपास १९२२ नागरिकांनी विविध महसुली सेवा,प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ घेतल्याची माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली.
यामध्ये सर्वाधिक ९४६ ऑनलाईन सातबारा व ३५५ ऑनलाईन ८ अ चे वितरण करण्यात आले.
नागरिकांच्या दैनंदिन महसुली समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे आणि शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर हे अभियान राबविण्यात येत असताना पुरंदर तालुक्यातील शिवरी व वाल्हे मंडलातील नागरिकांच्या सोयीसाठी शिवरी येथे हे शिबिर पार पडले.
यावेळी आमदार विजय शिवतारे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, सहाय्यक निबंधक रविंद्र फुलपगारे,नायब तहसीलदार संदीप पाटील,पंचायत समिती सभापती अमित झेंडे,उपसभापती प्रविण जगताप, जि.प. सदस्य हरिभाऊ लोळे,प्राजक्ता दुर्गाडे,अजय इंगळे,पंचायत समिती सदस्य माणिक निंबाळकर,मोनिका कांबळे,स्मिता निगडे,माऊली यादव शिवरी ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रमोद जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
या शिबिरात प्रलंबित फेरफार प्रकरणे – ५७, ७/१२ दुरुस्ती प्रकरणे – २१ ,जिवंत ७/१२ चे -१२७, डिजिटल ७/१२ चे वितरण -९४६, ८अ उतारे देणे – ३५५ देण्यात आले. त्याचबरोबर तुकडेबंदी नियमनाची ७ प्रकरणे, वर्ग १ व वर्ग २ जमिनीशी संबंधित २ प्रकरणे, तसेच भूमापनाशी संबंधित काही प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत जात प्रमाणपत्र २७, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र १५, उत्पन्न प्रमाणपत्र ४७ आणि रहिवासी/अधिवास प्रमाणपत्र १२ असे विविध दाखले नागरिकांना देण्यात आले. सामाजिक योजनांअंतर्गत संजय गांधी व इंदिरा गांधी योजनांमधील ६९ लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला.तसेच ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पी.एम. किसान योजना आणि तक्रार निवारण आदी सेवाही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
” शासन सर्वसामान्य नागरिकांना जलद,पारदर्शक व सुलभ शासकीय सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ थेट त्यांच्या गावात मिळावा हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.प्रसासकीय अधिकाऱ्यांनी नुसते दाखले देत बसू नये तर इतर योजना ही सर्व सामान्यापर्यंत पोहोचवाव्यात. संवेदनशील असे काम करावे “.
विजय शिवतारे, आमदार पुरंदर -हवेली.
वाल्हे मंडलासाठी कोळविहिरे येथे होणार शिबिराचे आयोजन…
शिवरी येथे आयोजित केलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे शिवरी व वाल्हे या दोन मंडळाचे एकत्रित असल्याने अनेक गावांतील नागरिकांना २० किलोमीटर प्रवास करून येथे यावे लागत असल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भातील वृत्त दै. लोकमत ने दि. १३ मार्च रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने कोळविहिरे येथे वाल्हे मंडलासाठी या शिबिराचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.




