पुरंदर विकासकामाबाबत टेकवडेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
पुरंदर विकासकामाबाबत टेकवडेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
जेजुरी, दि.२२ पुरंदर तालुक्यातील विविध विकास कामांबाबत पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी नागपूर येथे जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विविध विकासकामांच्या मागण्या ही करण्यात आल्या.
नागपूर येथे विधानसभेवर हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुरंदर चे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरंदर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी संकटात तात्काळ पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चारा डेपो सुरू करावा, पुरंदर उपसा आणि जानाई उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहावी, खानवडी येथे सांस्कृतिक विभागाकडून थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा भव्य दिव्य पुतळा उभारावा, उरुळी देवाची व फुरसुंगी येथील नगरपालिका किंवा महानगर पालिका याबाबतचा अर्धवट व न्यायप्रविष्ठ बाबींमुळे निर्माण झालेल्या नागरिकांच्या विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक व्हावी पुरंदर हवेलीतील विविध विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा, सासवड व जेजुरी नगरपालिका ह्ददीतील नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी त्वरित उपलब्ध व्हावे म्हणून आवश्यक ते कार्यवाही तात्काळ केली जावी आदी प्रमुख मागण्या यावेळी आ.अशोक टेकवडे यांनी केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपण जातीने लक्ष घालू असे आश्वासन दिल्याचे श्री.टेकवडे यांनी सांगितले.
यावेळी दौड चे आ. राहुल कुल, आ. जयकुमार गोरे, पुरंदर तालुका भाजपा चे प्रभारी गंगाराम जगदाळे, सरचिटणीस गणेश मेमाणे, आदी उपस्थित होते.